मुख्य अंक, पान ३
----------------------
संचालकांतील अस्थिरतेचा जि. प. बँकेला फटका
---
सभासदांमध्ये तीव्र नाराजी ः दोन संचालकांनी कर्ज थकविल्याने चौकशी होणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : शासकीय कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या अस्थिर कारभाराचा बॅंकेच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. बँकेतील ठेवी घटत असून, संचालक मंडळाची अविश्वासार्हता वाढल्याने सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या अध्यक्षांविरोधात संचालकांनी राजीनामा दिला होता. अध्यक्ष देशमुख यांनी राजीनामा दिलेला असताना आता संचालक महेश मुळे आणि अमोल बागूल यांनी बँकेचे कर्ज थकीत ठेवल्याने आणि बँकेच्या पोटकलमांचे उल्लंघन केल्याने त्यांचे संचालकपद धोक्यात आले आहे.
जिहा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी या संचालकांना नोटीस बजावली असून, १५ दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, या प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह निबंधक कार्यालयात १८ सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र आंधळे यांनी १७ ऑगस्ट २०२६ ला जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे या संदर्भात तक्रार अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम ७३ क (अ)मधील तरतुदींनुसार, कोणतीही व्यक्ती संस्थेची कसूरदार ठरल्यास किंवा कर्जाचे हप्ते थकविल्यास ती व्यवस्थापन समितीचे संचालकपद भूषविण्यास अपात्र ठरते. मुळे यांनी या कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आल्याने त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. संचालक मंडळाचे अंतर्गत वाद आणि हेव्यादाव्यांमुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत असल्याने सभासदांनी या विषयी नाराजी व्यक्त केली.
-------------
कोट
संचालक मंडळाचे कामकाज बँकेसाठी अडचणीचे ठरायला नको. यातून सभासदांच्या विश्वासार्हतेला तडा जातो. जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचा नावलौकिक मोठा असून, त्याला साजेसे कामकाज होण्याची अपेक्षा आहे.
- भाऊसाहेब खातळे, माजी अध्यक्ष, जि. प. सहकारी बँक
-----------