मेनफिचर
----------
शहर टुडे पान चारसाठी
--------------------
फोटो येणार आहेत
जळगाव : देखावे पूर्ण करण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची रविवारी सुरू असलेली लगबग.
----------------------
जळगाव : श्रीगणेश स्थापनेच्या पूर्वसंध्येला रविवारी बाजारात मूर्ती खरेदीसाठी झालेली भाविकांची गर्दी.
---------------------------
देखावे पूर्ण करण्यासाठी मंडळांची लगबग
-------
पावसाचा व्यत्यय; सजावटीचे साहित्य, वीजउपकरणांच्या सुरक्षेची कसरत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून आकर्षक देखावे उभारण्याची लगबग सध्या सुरू झालेली दिसून येत आहे. गणेशोत्सवाला एकच दिवस शिल्लक राहिल्याने देखावे पूर्ण करण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेताना दिसून येत आहेत. मात्र, अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे सजावट व रंगकामाच्या कामात व्यत्यय येत असून, मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच कसरत होत आहे.
शहरातील विविध भागांतील गणेश मंडळांनी यंदा सामाजिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक व पर्यावरणपूरक विषयांवर आधारित देखावे उभारण्यास प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. काही मंडळांकडून भव्य प्रवेशद्वारे, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध प्रतिकृती व चलचित्र देखावे साकारण्यात येत आहेत. त्यात देखाव्यांचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून, उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झालेली आहे.
........
पावसामुळे येतोय व्यत्यय
शहरात अधून-मधून कोसळणाऱ्या पावसामुळे थर्माकोल, कापड, प्लायवूड, रंग व अन्य सजावटीच्या साहित्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून ताडपत्री व प्लास्टिकच्या आच्छादनांचा वापर केला जात आहे. विद्युत रोषणाई करतानाही विशेष खबरदारी घेतली जात आहे. पावसामुळे रंगकाम रखडत असल्याने हवामानाचा अंदाज घेत कामाचे नियोजन करावे लागत आहे.
.......
रात्री उशिरापर्यंत कामे
गणेश मंडळांच्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी व कार्यकर्ते काम करताना दिसत आहेत. मूर्तीकार, सजावटकार, विद्युत कामगार व मंडळांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय साधून कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. देखावे आकर्षक असण्याबरोबरच सुरक्षित राहावेत, यासाठीही मंडळांकडून काळजी घेतली जात आहे.
--
मूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी
दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. गणपतीची मूर्ती खरेदीसाठीदेखील भाविकांनी रविवारी दुपारपासून बाजारात गर्दी केलेली होती.