मेन
लोगो : नाशिकचे अष्टविनायक
---
ओंकार प्रधानरूप गणेशाचे...
प्रशांत भरवीरकर/ सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : नाशिक हे धार्मिक क्षेत्र असून येथे श्री गणरायाच्या मंदिरांची भूमी म्हणून एक ओळख आहे. येथील गणपतींमध्ये नाशिकचे अष्टविनायक प्रसिद्ध असून अनेक भक्त गणेशोत्सवात त्यांची वारी करतात. आज सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या अष्टविनायकांची माहिती...
--
फोटो : H29508
चांदीचा गणपती
नाशिकचा मानाचा गणपती म्हणून शहराच्या रविवार कारंजा या भागात स्थित असलेला चांदीचा गणपती भाविकांच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरातील व रविवार कारंजा परिसरातील काही जागृत देशभक्त नागरिकांनी १९१७ पासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. २००८-०९ मध्ये २०१ किलो भरीव चांदीची मूर्ती करून मंदिर बांधले. त्यात सिद्धिविनायक गणपती मूर्तीची विधिवत स्थापना केली, तोच चांदीचा गणपती.
---
फोटो : H29514
मोदकेश्वर गणपती
श्री मोदकेश्वर पुरातन स्वयंभू सिद्धस्थान आहे. गौरीशंकर पटांगणासमोर पूर्वाभिमुख असलेल्या या जागृत व अतिपुरातन मंदिराचे वर्णन श्री गणेश पुराण, श्री गणेश कोश, श्री पंचवटी यात्रा दर्शन, गोदावरी महात्म्य, नाशिक तीर्थक्षेत्र दर्शन यात विशेषत्वाने आढळते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणेश क्षेत्रात श्री मोदकेश्वर गणपतीची गणना होते.
---
फोटो : H29510
मेनरोडचा गणपती
मेन रोडचा गणपती अशीच ज्याची ओळख आहे; त्या विघ्नहर्त्या गजाननाच्या मंदिर मेन रोडला आहे. सुबक फेटेवाली मूर्ती, छोटासा पण प्रसत्र, गाभारा आणि शिसवी महिरपीदार खांबांनी, खास जुन्या थाटाच्या हंड्यांनी सजविलेला सभामंडप अशी मंदिराची रचना आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान, पं. कृष्णराव शंकर पंडित, गजाननबुवा जोशी, गोविंदराव पटवर्धन, द. वि. उर्फ बापुराय पलुस्कर यासारखी बडी मंडळी येथे गायनाच्या मैफल करून गेले आहेत.
---
फोटो : H29512
उजव्या सोंडेचा गणपती
नाशिक तीर्थक्षेत्रात अनेक पौराणिक मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी प्राचीन असलेले श्री गोराराम मंदिर १७८२ मध्ये बांधण्यात आले. श्रीमंत माधवराव पेशवे यांचे सरदार महादेवराव हिंगणे यांनी हे मंदिर बांधल्याचे उल्लेख सापडतात. येथे श्री गणेशाची विलोभनीय मूर्ती येथे दिमाखात विराजमान आहे. सरदार माधवराव हिंगणे यांनी अनेक धर्मशाळा, मंदिरे बांधली. त्यातील गोरेराम हे एक मंदिर असून या मंदिरात श्रीगणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे. पांढऱ्या पाषाणातील ही मूर्ती अत्यंत देखणी आहे.
---
फोटो : H29511
श्री तिळा गणपती
श्री तिळा गणपतीचे मंदिर हे नाशिकच्या भूषणांपैकी एक असून तब्बल ७५० वर्षांपूर्वीची ही मूर्ती आजही प्रसन्न मुद्रेत अबाधित आहे. गणेशवाडीमध्ये श्री तिळा गणपती मंदिर असून दामोदर दगडूशेठ सोनार (भडके) यांच्या घराचा पाया खोदत असताना ही डाव्या सोंडेची गणपतीची मूर्ती सापडली होती. तेव्हापासून आजतागायत तिच्या पूजेची परंपरा आहे. तीळ तीळ वाढणारा गणपती म्हणून याचे नाव ‘तिळा गणपती’ असे पडले.
---
फोटो : H29509
लोथे गणपती
कसबे नाशिक (पूर्वीचे) येथील गायधनी गल्लीच्या कोपऱ्यावरील घर नं ९०० येथील बापाजी लोथे यांनी बांधलेल्या राहत्या घरात कळस नसलेले गणपतीचे मंदिर आहे, हेच ते प्रसिद्ध लोथे गणपती मंदिर. हा उजव्या सोंडेचा गणेश आहे. हे मंदिर अतिशय पुरातन आहे. श्री गजाननाच्या वरील उजव्या हातात परशू व त्याखालच्या हातावर फूल कोरलेले आहे. तळवा मांडीवर ठेवलेला असून आकाशाच्या दिशेने आहे. डाव्या हातात गदा व खालच्या हातात मण्यांची माळा व फुलाचे चिन्ह, मुकुट विराजमान आहे.
---
फोटो : H29513
उपाध्याय (पंचदेव) गणेश
पूर्वीचा त्र्यंबक नाका भद्रकाली, दूध बाजार येथे उपाध्ये (पंचदेव) श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. या गणपतीसाठी देखभाल करणाऱ्यांनी पंचदेव गणेश भक्त नावाने मंडळ स्थापन केलेले असून म्हणून त्याला पंचदेव गणेश असेही म्हणतात. श्रीगणेशाची मूर्ती अत्यंत विलोभनीय असून काळ्या पाषाणातील ही मूर्ती जवळपास ५५० वर्षांपूर्वीची आहे.
---
फोटो : H29507
अजगरेश्वर गणपती
नाशिकला मंदिरांचा इतिहास आहे. या इतिहासातीलच एक मंदिर म्हणजे अजगरेश्वर गणपती मंदिर. हे मंदिर पेशव्यांचे सरदार विंचूरकर यांनी बांधल्याचे उल्लेख सापडतात. नाशिकचे एक अवलिये म्हणजे अजगर महाराज. यांच्या संजीवन समाधी मंदिरातच हा गणेश विराजमान आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिलालेख असून ‘श्री श्री लक्ष्मी नृसिंह चरणी तत्पर अमृतराव शिवदेव उमदे तुलमूक बहादूर विंचूरकर शके १७२०’ असा उल्लेख त्यावर आहे.