नागसेननगराला भरदिवसा गोळीबार
शहरात प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : जुन्या भांडणाच्या कारणावरून कारने धडक देऊन दुचाकीवरील युवकाला गावठी कट्ट्यातून भरदिवसा गोळीबार केल्याची खळबळजनक घटना नागसेननगर भागात घडली. तर, किराण्याची उधारी मागितल्याच्या कारणातून संशयितांनी बापलेकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून, उपनगरला दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याचा प्रकारही घडला. वाढत्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहरातील टवाळखोरांच्या मुजोरीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
फैजल फिरोज खान (वय २१, रा. भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित समीर शहा व त्याच्या मित्राविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा मुंबई नाका पोलिसात दाखल झाला आहे. शनिवारी (ता. १२) दुपारी फैजल खान व त्यांचा भाऊ दुचाकीने जात असताना संशयित समीर शहा याने कारने कट मारून त्यांना पाडले आणि गावठी कट्ट्यातून गोळी झाडून पळ काढला. सुदैवाने गोळी चुकल्याने तो बचावला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात जीवे ठार मारण्यासह अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक गावित पुढील तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत किराणा मालाची उधारी मागितल्याच्या रागातून दुकानदारावर व त्यांच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना अंबड लिंक रोडवर घडली आहे. अभिषेक शिवाजी साठे (२७, रा. बालाजी पार्क, अंबड) यांच्या तक्रारीवरून संशयित करण ढोमसे व त्याच्या ५ ते ६ नातेवाइकांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १२) दुपारी संशयितांनी साठे यांच्या दुकानात घुसून साठे आणि त्यांच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी व वस्तूने डोक्यात मारून जखमी केले. मारामारीत सोन्याची साखळी व मोबाईल गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करत आहेत. तर, दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना उपनगर नाका येथील कॅनॉल रोडवर घडली. साहिल दामोदर खैरनार (२४, रा. उपनगर) यांच्या फिर्यादीवरून संशयित सचिन कागडा (रा. जेल रोड) व त्याच्या दोन साथीदारांवर उपनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. ११) रात्री अकरा संशयितांनी साहिलकडे दारूसाठी पैसे मागितले. नकार दिल्याने सचिन कागडा याने धारदार शस्त्राने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. साहिलने वार हुकवल्याने त्याच्या नाकाला व डोळ्याला दुखापत झाली.