टुडे पान एकसाठी
---
लोगो : बस
---------
भीम ॲपवरूनही ‘एनसीएमसी’ कार्डचे टॉप-अप
---
प्रवाशांना दिलासा; डिजिटल पेमेंटमुळे बसप्रवास अधिक सुलभ
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्डचे टॉप-अप करण्याची सुविधा आता अधिक सोपी झालेली आहे. ‘भीम’ ॲपच्या माध्यमातून ‘एनसीएमसी’ कार्डमध्ये रक्कम टॉप-अप करता येणार असल्याने प्रवाशांना रिचार्जसाठी केंद्र किंवा काउंटरवर जाण्याची गरज राहणार नाही. ‘भीम’ ॲपकडून ‘एनसीएमसी’ कार्ड रिचार्जची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याबाबत अधिकृत मार्गदर्शक माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रत्येक सवलतधारकाला ‘एनसीएमसी’ कार्ड बंधनकारक केले आहे. हे कार्ड असलेल्या प्रवाशालाच प्रवास भाड्यात सवलत मिळेल. दरम्यान गेल्या एक सप्टेंबरपासून हे कार्ड बंधनकारक केले असताना प्रवासात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे याला आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यानंतर महामंडळाने आता ‘एनसीएमसी’ कार्डमध्ये रक्कम टॉप-अपसाठी सुविधा सुरू केली आहे.
डिजिटल पद्धतीने सुविधा
‘एनसीएमसी’ कार्डचा वापर मेट्रो, बस व ‘एनसीएमसी’ सुविधा उपलब्ध असलेल्या इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये करता येतो. कार्डमधील प्रवासासाठीच्या वॉलेटमध्ये रक्कम उपलब्ध असणे आवश्यक असते. विविध बँका ‘एनसीएमसी’ कार्डच्या वॉलेटमध्ये रक्कम भरण्यासाठी ऑनलाइन किंवा अधिकृत माध्यमांची सुविधा देतात. आता भीम ॲपच्या माध्यमातून टॉप-अप करता येत असल्याने प्रवाशांना मोबाईलवरूनच रिचार्ज करण्याचा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे ऐनप्रवासाच्या वेळी कार्डमधील शिल्लक रक्कम कमी असल्यास रिचार्ज करणे अधिक सोयीचे होणार आहे.
रांगा टाळता येणार
‘एनसीएमसी’ कार्डचा नियमित वापर करणाऱ्या प्रवाशांना रिचार्जसाठी काउंटरवर रांगेत उभे राहण्याऐवजी डिजिटल पद्धतीने टॉप-अप करण्याचा पर्याय मिळणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, कर्मचारी व इतर प्रवाशांसाठी ही सुविधा वेळ वाचविणारी ठरू शकते.