शहर पान चारसाठी
NSK26H29520
जळगाव : चंदूअण्णानगर-खोटेनगर रस्ता दुरुस्तीबाबत नवलसिंग पाटील यांना निवेदन देताना प्रा. डॉ. संदिप पाटील व परिसरातील नागरिक.
-----------------
चंदू अण्णानगर-खोटेनगर
रस्ता त्वरित दुरुस्त करा
----
प्रभाग नऊमधील नागरिकांची पालकमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील चंदूअण्णानगर ते खोटेनगर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. म्हणून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. स्थानिक रहिवासी प्रा. डॉ. संदिप पाटील यांच्यासह काही नागरिकांनी याबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना नुकतेच दिले.
पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक नवलसिंग पाटील यांनी शासकीय पद्मालय विश्रामगृहात हे निवेदन स्वीकारले. प्रभाग क्रमांक नऊचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदूअण्णानगर ते खोटेनगर या मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरच तालुका पोलिस ठाणे, तलाठी व महसूल कार्यालय, कचरा फॅक्टरी, शिवाय मुख्य रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांसह शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचीही या मार्गावर मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. मात्र, रस्त्यावर असलेले खड्डे व चिखलामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात तर अधिकच त्रास सहन करावा लागत असतो. प्रा. पाटील यांनी नवलसिंग पाटील यांच्याशी संवाद साधून प्रभागातील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना होत असलेल्या अडचणींची माहिती दिली. सोबतच रस्त्याच्या सध्यास्थितीचे फोटो व व्हिडिओही दाखवून त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात दिले. दरम्यान, पालकमंत्र्यांनी या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन महापालिका आयुक्तांना निर्देश द्यावेत व चंदूअण्णानगर ते खोटेनगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रा. डॉ. संदिप पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.