धुळे टुडे १ साठी...
---
फोटो- NSK26H29504
धुळे ः श्री भाऊसाहेब हिरे शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील पाकगृहात रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांकडून माहिती घेताना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते.
---
औषधे, स्वच्छता, दर्जेदार आहाराला प्राधान्य द्या
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते; हिरे महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १३ ः रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक औषधे पुरेशा प्रमाणात व वेळेवर उपलब्ध झाली पाहिजेत, आवश्यक सर्व चाचण्या रुग्णालयातच व्हाव्यात, रुग्णालयातील कक्ष, परिसर व स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवावीत, तसेच रुग्णांना स्वच्छ, पौष्टिक व दर्जेदार आहार वेळेवर उपलब्ध करून द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी विसपुते यांनी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात अचानक भेट देऊन रुग्णसेवा व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी अधिष्ठाता डॉ. अजित पाठक, प्रांताधिकारी रोहन कुवर, तहसीलदार अरुण शेवाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकर्रम खान, प्रशासकीय अधिकारी संध्या चौधरी, डॉ. निता हटकर, डॉ. अरुण नागे, डॉ. पौर्णिमा नागे, डॉ. अरुण मोरे यांच्यासह इतर डॉक्टर, परिचारिका, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विसपुते यांनी अपघात विभाग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, बालरोग विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग, तसेच आहार पॅन्ट्रीला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. या वेळी त्यांनी डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक यांच्यासह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी थेट संवाद साधून रुग्णालयातील सेवांबाबत माहिती घेतली.
रुग्ण, नातेवाइकांशी संवाद
रुग्णांना औषधे वेळेवर मिळतात का, आहार वेळेवर दिला जातो का, बेडशीटची नियमित स्वच्छता केली जाते का, तसेच कोणतीही औषधे बाहेरून खरेदी करण्यासाठी लिहून दिली जात नाहीत ना, याबाबत विसपुते यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून माहिती जाणून घेतली. रुग्णालयात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा कायम उपलब्ध ठेवावा आणि औषधांअभावी कोणत्याही रुग्णाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णांच्या आवश्यक सर्व चाचण्या रुग्णालयातच वेळेत करण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी दिली. जिल्हाधिकारी विसपुते यांनी आहार व पाकगृहाचीही पाहणी केली. रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्या, खाद्यतेल, दूध, तसेच अन्य अन्नसामुग्रीची गुणवत्ता त्यांनी तपासली. अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
दरम्यान, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आगामी काळात वैद्यकीय विद्यार्थ्यांशी त्यांचा थेट संवाद घडवून आणण्यात येणार असून, विद्यार्थ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण, उपलब्ध सुविधा, तसेच त्यांच्या अपेक्षांबाबत सुसंवाद साधण्यात येणार आहे.