पोलिसांतील तक्रार मागे
घेण्यासाठी पाइपाने हल्ला
-------
फरार चार संशयितांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : गेल्या वर्षी पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने तालुक्यातील शिरसोली येथील तरुणावर चौघांनी हल्ला चढवीत लोखंडी पाईप व लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली(प्र.बो.) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मागे राहुल संजय पाटील (वय २८) हा तरुण शेतकरी कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. शुक्रवारी(ता.११) दुपारी दीडच्या सुमारास राहुल पाटील आपल्या घरासमोर उभा असताना संशयित अशोक उर्फ भय्या वासुदेव ताडे, गणेश उर्फ चांपर बारी, दिगंबर ताडे व वैभव नितीन ताडे (सर्व रा. शिरसोली) तेथे आले. तू आमच्याविरुद्ध दिलेली पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घे, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी देत शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. अशोक ताडे याने लोखंडी पाईप राहुलच्या डोक्यात टाकून त्याला रक्तबंबाळ केले. त्यानंतरही त्याच्यावर लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. जखमी राहुलच्या तक्रारीवरून चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक धनराज गुळवे करीत आहेत.