फोटो : NSK26H29556
नंदुरबार : नगरपालिका प्रशासनानाला निवेदन देतांना विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, पंकज चौधरी, ॲड. प्रकाश भोई.
-------------------
साथीच्या रोगांवर तातडीने उपाययोजना कराव्यात
नगरसेवक पंकज चौधरी यांची पालिकेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : शहरात डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. मात्र, नंदुरबार नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने याबाबत अद्याप दखल घेतलेली नाही. साथीच्या आजारांचा प्रसार करणाऱ्या मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी शहराच्या सर्व भागात औषध फवारणी करून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक पंकज चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे यांनी केली आहे.
निवेदनानुसार, नंदुरबार शहरात साथीचे रुग्ण वाढत आहेत. नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयात यासाठी ‘ओपीडी’चा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे शहराच्या सर्व भागात डीडीटी पावडर टाकणे आणि द्रव्य स्वरूपातील प्रभावी औषध फवारणी करणे आवश्यक आहे. नंदुरबार शहराच्या सर्व वसाहतींमध्ये आणि शहराच्या मध्यवर्ती परिसरात मच्छर, डास आणि सूक्ष्म कीटकांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे उघड्यावर विक्रीला ठेवलेली फळे, विविध अन्नपदार्थ तसेच भाजीपाला दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने स्वच्छता पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी ॲड. विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, प्रकाश भोई, भूषण सोनार उपस्थित होते.