सेकंडमेन
---
मिठाईत खव्याऐवजी केमिकलचा वापर
------
तब्बल ९२३ किलो पदार्थ जप्त; सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : श्रीगणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन(एफडीए) विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जळगाव शहर व पाचोरा येथे केलेल्या कारवाईत गुजरातहून आणलेले संशयास्पद प्रोप्रायटरी फूड, भेसळयुक्त तुप व क्रीम असा एकूण ९२३.४ किलो वजनाचा व चार लाख ३६ हजार २२२ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दिनानाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. अन्नसुरक्षा अधिकारी अमोल जगताप यांच्या पथकाने गुरुवारी (ता.१०) जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स व नमकीन येथे तपासणी केली. या ठिकाणी गुजरातहून मागविलेले ३७० किलो वजनाचे ९३ हजार २० रुपयांचे प्रोप्रायटरी फूड आढळून आले.
खव्याऐवजी वापरण्यात येणारा हा संशयास्पद पदार्थ दिसायला खवा व बर्फीसारखा आहे. त्याचा वापर मिठाई तयार करण्यासाठी केला जात असल्याचे तपासणीत आढळून आले. दुधापासून तयार केलेल्या अस्सल खव्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून अशा पदार्थाचा वापर करून पेढे व बर्फी तयार केली जात असल्याचा संशय आहे. त्यानंतर पथकाने पाचोरा येथेही दोन ठिकाणी कारवाई करून सुमारे २ हजार ५०० रुपयांचा संशयास्पद साठा नष्ट केला. पाचोरा येथील कारवाईत १ लाख ३२ हजार ३९२ रुपये किमतीचे १७४.२ किलो संशयास्पद तूप तसेच २ लाख ८ हजार ५६० रुपये किमतीचे ३७९.२ किलो क्रीम जप्त करण्यात आले.
.......
अशी ओळखावी भेसळ?
पेढा किंवा खवा हातावर चोळल्यास तो अनावश्यकपणे तेलकट किंवा चिकट जाणवत असेल व त्याला नैसर्गिक दुधाचा वास नसेल, तर भेसळीचा संशय घ्यावा. शुद्ध दुधापासून तयार केलेला पेढा साधारणपणे किंचित तांबूस-लालसर छटा असलेला असतो. अतिशय पांढरा शुभ्र रंग संशय निर्माण करू शकतो.
.......
नागरिकांनी सावध राहावे
सणासुदीच्या काळात स्वस्त दरात मिळणाऱ्या किंवा अनधिकृत ठिकाणी तयार केलेल्या मिठाई, खवा, तुप व दुग्धजन्य पदार्थांची खरेदी करताना नागरिकांनी काळजी घ्यावी. निकृष्ट किंवा संशयास्पद दर्जाचा खाद्यपदार्थ आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.