फोटो : 29571
नाशिक : पशुसंवर्धन विभागाचे सहसचिव निवृत्ती मराळे यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करताना डॉ. बी. आर. नरवाडे, प्रदीप झोड, डॉ. सदाशिव बेडक्याळे, डॉ. संजय शिंदे, डॉ. भगवान पाटील.
….
‘पशुसंवर्धन’च्या सभासदांना १० लाखांपर्यंत कर्ज
वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय : गुणवंत विद्यार्थी, निवृत्त सभासदांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : पशुसंवर्धन पतसंस्थेच्या सभासद कल्याण निधीत ५० हजारांची वाढ करून आता एक लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच सभासदांना १० लाखापर्यंतचे कर्ज देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
जिल्हा पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणवंत विद्यार्थी, क्रीडा प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी, निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा रविवारी नाशिकमधील कालिका मंदिर सभागृहात पार पडला. या वेळी मुंबई विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, नाशिक विभागाचे सहआयुक्त प्रदीप झोड, नाशिकचे उपायुक्त डॉ. सदाशिव बेडक्याळे, धुळे उपायुक्त येथील डॉ. जी. आर. पाटील, नाशिकचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते.
या वेळी निवृत्ती मराळे म्हणाले, की गुणवंत व सत्कारार्थी विद्यार्थ्यांचा झालेला सत्कार हा आपल्या यशाचा शेवट नसून पुढील यशाची सुरुवात आहे. एका सत्कारावर समाधान न मानता जीवनात अनेक सत्कार मिळविण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी ठेवावे.
सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या मुदत ठेव योजनेत एक वर्षासाठी मुदत ठेव करणाऱ्या सभासदांना ८ टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. विधवा, दिव्यांग आणि निवृत्त सभासदांना त्यापेक्षा अर्धा टक्का अधिक व्याजदर देण्यात येईल. पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र केदार यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन केले. या वेळी पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र चांदोरे, कार्याध्यक्ष डॉ. संतोष पजई, राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, उपाध्यक्ष मनोज म्हस्के, कोशाध्यक्ष डॉ. युवराज वाणी, सचिव एस. व्ही. कसबेकर व संचालक, सभासद उपस्थित होते.
लाभांश इमारत निधीमध्ये वर्ग
पतसंस्थेने सभासदांना यंदा ९ टक्के लाभांश जाहीर केला होता. मात्र, सभासदांनी स्वतःहून अर्धा टक्का लाभांश कमी करून तो निधी संस्थेच्या इमारत निधीमध्ये वर्ग करण्याचा आग्रह केला. संस्थेच्या भविष्यातील विकासासाठी सभासदांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या संस्थेविषयी असलेल्या आत्मीयता, अस्मिता, विश्वास आणि बांधिलकीचे द्योतक असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.