जिल्ह्याला गौणखनिजचे २०० कोटींचा लक्ष्यांक
जिल्हा प्रशासन : नाशिक तालुक्याला ४५.४ कोटींचे उद्दिष्ट
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : राज्यस्तरावरून जिल्ह्याला २०२६-२७ वर्षात गौणखनिज वसुलीचा २००.२० कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने प्राप्त लक्ष्यांकानुसार पंधराही तालुक्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. नाशिक तालुक्याला सर्वाधिक ४५.४ कोटींचा निधी गोळा करावा लागणार आहे.
राज्य सरकारने ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्याला महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले. त्यामध्ये चालू वर्षी गौणखनिज वसुलीत २००.२० कोटींचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाशी तुलना केल्यास यंदा गौणखनिजच्या उद्दिष्टात ५० कोटींची घट सरकारने केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला काहीसा मिळाला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्राप्त लक्ष्यांकानुसार तालुक्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट देताना प्रशासनाने नाशिक तालुक्यावर यंदा मेहरनजर दाखविली आहे. दर वर्षी राज्यस्तरावरून लक्ष्यांक प्राप्तीनंतर त्यातील साधारणत: ६० ते ६५ टक्के उद्दिष्ट हे केवळ नाशिक तालुक्यावर थोपविले जात होते. मात्र, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुक्यावरील हा अन्याय यंदा दूर करण्यात आला.
नाशिक तालुक्याला चालू वर्षी गौणखनिजचे ४५.४ कोटींचा लक्ष्यांक ठरवून देण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक तहसीलला २३.२० कोटी, तर नाशिक अपर तहसीलच्या २२.२० कोटींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सिन्नरला २७.२ कोटी, दिंडोरीला २२ कोटींचा लक्ष्यांक असेल. त्या तुलनेत मालेगावच्या उद्दिष्टात घट करताना १९.१५ कोटींचा लक्ष्यांक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
नाशिक तालुक्याला दिलासा
गौणखनिज वसुलीत दर वर्षी नाशिक तालुक्याला सर्वाधिक महसूल गोळा करावा लागत होता. त्यामुळे सारूळ व राजूरबहुल्यावरच तहसील प्रशासनाची सर्व मदार असायची. मात्र, यंंदा सारूळ व परिसरातील दगडखाणींवर अवैध उत्खनन प्रकरणी प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असताना यंदा महसूल उद्दिष्टात घट झाल्याने तहसील प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
---
तालुकानिहाय उद्दिष्ट (कोटीत)
नाशिक तहसील २३.२०, नाशिक अपर तहसील २२.२०, निफाड ९.१५, सिन्नर २७.२, दिंडोरी २२, पेठ २.१५, इगतपुरी १३.१५, त्र्यंबकेश्वर १०, मालेगाव ९.६५, मालेगाव अपर तहसील ९.५०, येवला १०.१५, नांदगाव १०.१५, कळवण ७.१५, सुरगाणा २.१५, बागलाण ५.१०, चांदवड १०.१५, देवळा ७.१५.