शेतकरी कर्जदारांना ‘हेअर कट’ अन् व्याजमाफीचा लाभ
कर्जमुक्ती योजनेत ३,८०८ पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त; आतापर्यंत ३९ हजार ६९८ कर्जदार पात्र
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या कर्जदारांना मिळणार असला तरी त्यांचे एप्रिलपासूनचे व्याजही माफ करण्यात येणार आहे. तसेच कर्जाची मुद्दल किती प्रमाणात भरायची याचे सूत्र ठरविणारे ‘हेअर कट’ही लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यामुळे ‘ओटीएस’ स्वरूपात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे.
कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३ हजार ७९८ आणि राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ४५ हजार ६१ अशा एकूण ६८ हजार ८५९ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेचे १८ हजार ४५३ आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे १७ हजार ४३७ अशा एकूण ३५ हजार ८९० पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. त्यांपैकी ३२ हजार ३७५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन हजार २६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन हजार ८०८ पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली आहे. पात्र शेतकऱ्यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयात यादी
जिल्हा बँकेच्या एक हजार ३४३ आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या दोन हजार ४६३ अशा एकूण तीन हजार ८०८ पात्र खातेदार शेतकऱ्यांची दुसरी यादी प्राप्त झाली आहे. या सभासदांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयात उपलब्ध करून दिल्या आहेत.