मेनफिचर
टुडे पान एकसाठी
-----------
(सूचना : स्थापना व मिरवणुकीचे फोटो येणार आहेत)
------------------
NSK26H29577
जळगाव : शहरात सोमवारी गणेश मूर्ती घेऊन जाताना बापलेकी.
--------------
NSK26H29580
जळगाव : ढोलताशाच्या तालात गणेश मूर्ती स्थापनेसाठी निघालेल्या शोभायात्रेत सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
----------------
मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन
-------
भाविकांत नवचैतन्य; रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक मंडळांत विधिवत स्थापना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शहरासह जिल्ह्यात मंगलमय वातावरणात विघ्नहर्ता, मंगलमूर्ती व सुखकर्ता श्रीगणरायाचे मंगलमय वातावरणात सोमवारी (ता.१४) आगमन झाले. ढोलेताशा आदी वाद्यांच्या तालसुरात व मंत्रोच्चारात रात्री उशीरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्री’ची विधिवत स्थापना करण्यात आली. श्रीगणरायाच्या आगमनाने
भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, सर्वत्र मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांत खरेदीची लगबग सुरू होती. सोमवारीदेखील गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठांत सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. गणरायाच्या स्थापनेसाठी लागणारे फुले, हार, दुर्वा, पुजेचे साहित्य, अगरबत्ती, कापूर, सजावटीच्या वस्तू, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाई, नैवेद्यासाठी आवश्यक वस्तूंचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली.
.......
बाजारपेठेत दिवसभर गर्दी
गणेशोत्सवासाठी आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांत सोमवारी सकाळपासूनच नागरिकांची गर्दी वाढलेली होती. त्यात महिला, युवक, लहान मुलांसह कुटुंबीयांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. विविध प्रकारच्या फुलांच्या माळा, सजावटीच्या वस्तू व विद्युत माळांनी दुकाने सजली होती.
......
घरगुती गणरायालाही प्रतिसाद
घरगुती गणपतीच्या स्थापनेसाठी सोमवारी सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू होती. अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने गणरायाची पूजा-अर्चा करून विधिवत स्थापना केली. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात व फुलांची उधळण करीत गणेशमूर्ती घरी आणण्यात आली, तर काही कुटुंबांनी साधेपणाने गणरायाचे स्वागत केले.
.......
लहान मुलांत उत्साह
श्रीगणरायाच्या आगमनाचा सर्वाधिक आनंद लहान मुलांत पाहायला मिळाला. नवीन कपडे परिधान करून मुले कुटुंबीयांसोबत गणेशमूर्ती आणण्यासाठी गेली होती. घरी आल्यानंतर गणरायाच्या सजावटीतही मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. काही ठिकाणी मुलांनी स्वतः तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू व मखरांमधून गणरायाचे स्वागत केले.
.......
सार्वजनिक मंडळांत लगबग
जळगाव शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी आकर्षक मंडप उभारले आहेत. अनेक मंडळांनी सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक व प्रबोधनात्मक विषयांवर आधारित देखावे साकारले आहेत. आकर्षक मंडप, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई व विविध सजावटींमुळे गणेश मंडळांचे परिसर लक्षवेधी ठरत आहेत.
दुपारपासूनच मंडळांच्या कार्यकर्त्यांची गणरायाच्या स्थापना सोहळ्याची तयारी सुरू होती. मंडपाची अंतिम सजावट, विद्युत रोषणाईची व्यवस्था, पूजा साहित्याची तयारी व भाविकांच्या स्वागताची तयारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
.......
भक्तिमय वातावरणाला उधाण
श्रीगणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. मंदिरांतही भाविकांची वर्दळ वाढली होती. घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांत आरती, पूजा व आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.