मालेगावी १८ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा
गौणखनिज प्रतिष्ठान : ५० लाखांचा निधी; रस्त्याचे काँक्रिटीकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : जिल्हा गौणखनिज प्रतिष्ठानमधून मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खाणबाधित क्षेत्रातील शैक्षणिक तसेच भौतिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून निधी दिला जातो. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी मालेगावमधील विकासकामांसाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून तालुक्यात १९ विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये १८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. या प्रत्येक कामासाठी एक लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आघार खुर्द (बंधारपाडा), काष्टी, घाणेगाव, टिंगरी, वाके (डोंगराळे), निळगव्हाण, पांढरूण, रावळगाव, वडेल, सौंदाणे, आघार खुर्द, अंजन, वडेल (उंबरेश्वर), कंदाणे, लेंडाणे, गुगळवाड, मोहपाडा आणि टिपे येथील प्राथमिक शाळांसाठी हा निधी देण्यात आला आहे. ही सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत.
सोयगाव-फौजदारवाडीचे काँक्रिटीकरण
भौतिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सोयगाव उपकेंद्र ते फौजदारवाडी (ग्रामा-२३५) रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ३२ लाखांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या इवद क्रमांक-२ कार्यकारी अभियंता विभागामार्फत पूर्ण केले जाईल.
रॉयल्टी भरावी : जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील खाणधारक आणि गौणखनिज उत्खननदारांनी स्वामित्वधन (रॉयल्टी) पारदर्शकपणे तसेच वेळेत जमा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केल्या आहेत. जमा होणाऱ्या स्वामित्वधनातून जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून खाणबाधित भागांतील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा, ग्रामीण रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच विविध लोककल्याणकारी विकासकामे हाती घेणे शक्य होते.