धुळे : टुडे पान ४ साठी... अँकर
--
साक्री आगारास पंचेचाळीस लाखांचा नफा
--
उत्कृष्ट नियोजनामुळे जिल्ह्यात प्रथम क्रमांक; सामूहिक यश
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) साक्री आगाराने आपल्या व्यावसायिक व प्रशासनिक उत्कृष्टतेची परंपरा कायम राखत जिल्ह्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. प्रभावी नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमांच्या बळावर साक्री आगाराने चालू आर्थिक वर्षात जुलै ते ऑगस्टअखेरच्या अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत ४५ लाख रुपयांच्या नफ्याची घसघशीत कमाई केली आहे. आगाराच्या या आर्थिकदृष्ट्या यशस्वी कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
-
ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रवाशांसाठी एसटी बस ही लालपरी जीवनाची खरी वाहिनी मानली जाते. साक्री आगारांतर्गत धावणाऱ्या विविध ग्रामीण व लांब पल्ल्याच्या मार्गांवर प्रवाशांना वेळेत, सुरक्षित आणि विनाखंड सेवा देण्यावर प्रशासनाचा नेहमीच कटाक्ष राहिला आहे. बसफेऱ्यांचे काटेकोर व अचूक नियोजन, उपलब्ध मनुष्यबळाचा सुयोग्य व प्रभावी वापर, तसेच चालक आणि वाहकांनी दाखवलेली कर्तव्यकठोरता यामुळेच हे यश साध्य करणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात आठ लाख रुपये आणि ऑगस्ट महिन्यात थेट ३७ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवून आगाराने आपले व्यावसायिक श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.
-
आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांनी यशाचे श्रेय सहकारी कर्मचाऱ्यांना दिले. चालक, वाहक, यांत्रिकी विभाग तसेच प्रशासकीय पातळीवरील सर्व घटकांनी प्रामाणिकपणे आणि पूर्ण जबाबदारीने आपली कर्तव्ये पार पाडली, म्हणूनच आगार नफ्यात आणणे शक्य झाले, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. आगाराच्या या आर्थिक व सेवात्मक कामगिरीत सातत्याने सुधारणा होत असल्याने प्रवाशांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. आगामी काळात प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये आणखी वाढ करून आगाराची ही कामगिरी याहून अधिक उच्च पातळीवर नेण्याचा दृढ संकल्प आगार व्यवस्थापक अहिरे यांनी व्यक्त केला.