एनडीआरएफतर्फे हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण

एनडीआरएफतर्फे हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण
Published on
एनडीआरएफतर्फे हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण सिंहस्थ प्राधिकरणाचा आपत्ती व्यवस्थापनासाठी पुढाकार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : सिंहस्थामध्ये भाविकांची सुरक्षितता आणि मदतीसाठी कुंभमेळा प्राधिकरण १५ हजार स्वयंसेवक तैनात करणार आहे. प्राधिकरणातर्फे यातील एक हजार स्वयंसेवकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) निवासी प्रशिक्षण शिबिरात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिक-त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळ्यास ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने प्रारंभ होत आहे. यंदाचे सिंहस्थपर्व चोवीस महिन्यांचे असून, १२ कोटी भाविक हजेरी लावतील, असा सरकारचा अंदाज आहे. सिंहस्थ प्राधिकरणातर्फे त्यादृष्टीने तयारीवर भर दिला आहे. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. सिंहस्थ प्राधिकरणातर्फे १५ हजार स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत. हे स्वयंसेवक नदीघाट, मुख्य चौक, वाहनतळ, बस व रेल्वेस्थानक तसेच प्रमुख ठिकाणी सेवा देतील. येणाऱ्या भाविकांना सर्वतोपरी मदत करण्यासह व योग्य मार्गदर्शन, गर्दीचे नियोजन तसेच अन्य बाबींवर हे स्वयंसेवक काम करतील. तसेच सिंहस्थामध्ये ओढावणाऱ्या संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी हे स्वयंसेवक तत्पर असणार आहेत. १७ प्रकारच्या आपत्तीवर काम सिंहस्थ कुंभमेळ्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा १७ प्रकारच्या आपत्तींचा धोका निर्माण होऊ शकतो, अशा निष्कर्षाप्रत प्राधिकरण पोहोचले आहे. त्यामध्ये पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, भूकंपासोबत रासायनिक, जैविक हल्ल्याचा धोका अशा आपत्तींचा समावेश आहे. या संभाव्य आपत्ती ओढावल्यास त्यावर कशा प्रकारे मात करायची यावर प्राधिकरण सूक्ष्म पद्धतीने काम करते आहे. ते प्रशिक्षार्थी देणार इतरांना धडे सिंहस्थ प्राधिकरण एनडीआरएफच्या मदतीने हजार स्वयंसेवकांना आपत्ती निवारणासाठी निवासी प्रशिक्षण देणार आहे. या स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर ते अन्य १४ हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षित करतील, जेणेकरून सिंहस्थादरम्यान आपत्ती ओढावल्यानंतर त्यावर तातडीने मात करताना कमीत कमी जीवितहानी व वित्तहानी राखण्यास मदत मिळणार आहे. स्वयंसेवक येेथे देणार सेवा -नाशिक, त्र्यंबकेश्‍वरमधील नदीघाट -जिल्ह्यातील अंतर्गत व बाह्य वाहनतळ -नाशिकमधील महत्त्वाचे चौक, स्थान -नाशिक, त्र्यंबकेश्‍वरमधील साधुग्राम -रेल्वे व बसस्थानकांवर नियुक्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com