अभियंता पतपेढीतर्फे आज
अभियंता पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : येथील जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीतर्फे मंगळवारी (ता.१५) भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा होणार आहे. यानिमित्त दोन अभियंत्यांना डॉ. एम. विश्वेश्वरय्या पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता राजेश मोरे असतील.
शहरातील महाबळ कॉलनी रोडवरील अभियंता भवनात सकाळी दहाला हा सोहळा सुरू होइल. यावेळी सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे सहायक अभियंता प्रवीण बेंडकुळे, जळगाव गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांना भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियंता गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. जळगाव येथील माय माती फाऊंडेशनेच्या प्रभावती पाटील यांना भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या विशेष गौरव पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता संतोष भोसले, जळगाव सार्वजनिक बांधकाम मंडळाचे पी. पी. सोनवणे, माजी राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, जिल्हा शासकीय अभियंता पतपेढीचे चेअरमन प्रमोद पाटील, संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर तायडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील आदी उपस्थित राहतील.