( टुडे पान एक मेन)
फोटो : NSK26H29651
नंदुरबार : नंदुरबार शहरातील मानाचा दादा गणपती मूर्तीच्या स्थापनेप्रसंगी भाविकांची झालेली गर्दी.
फोटो : NSK26H29649
नंदुरबार : शहरातील मानाच्या बाबा गणपती मंडळाच्या गणेश मूर्तीची महाआरती करताना भाविक.
----------------------------------
नंदुरबार जिल्ह्यात गणरायाची जल्लोषात स्थापना
बाजारपेेठेत नागरिकांची अभूतपूर्व गर्दी; लेझीम पथकाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : शहरासह जिल्ह्यात विघ्नहर्ता गणरायाची ढोल- ताशांच्या गजरात विधीवत स्थापना करण्यात आली. या वेळी गुलालाची उधळण करीत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करण्यात आला. सार्वजनिक मंडळांसह घरगुती स्वरूपात गणरायाचे वाजत- गाजत उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाची मूर्ती व सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेेठेत नागरिकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली.
-----------
नंदुरबार शहराच्या गणेशोत्सवाला १४४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. शहरातील मानाचा श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपती उत्सवाला मोठा इतिहास असून, या दोन्ही मानाच्या गणपतींची पारंपरिक पद्धतीने स्थापना करण्यात आली. रथावरच कोणत्याही साच्याशिवाय केवळ काळ्या मातीपासून या मूर्ती बनविल्या जातात. या मूर्ती पाहण्यासाठी यंदाही भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याशिवाय गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर, धडगाव आणि अक्कलकुवा या तालुक्यातही विविध गणेश मंडळांनी गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. घरगुती गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत मूर्ती स्टॉलवर भाविकांची गर्दी होती.
यावर्षी जवळपास सर्वच छोट्या- मोठ्या मंडळांतर्फे मिरवणूक काढून गणरायाचे वाजत- गाजत स्वागत करण्यात आले. लेझिम पथकांनीही स्वागत मिरवणूकांमध्ये सहभाग नोंदविला होता. बाजारपेठेत पूजेचे साहित्य, सुकामेवा, मिठाई आणि फुलांची विक्रमी खरेदी झाली. नंदुरबारच्या मूर्तींना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून यावर्षीही मोठ्या प्रमाणात मागणी झाली. यंदा जिल्ह्यात मूर्ती व्यवसाय आणि सजावट साहित्य विक्रीतून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरुणींनी नऊवारी साड्या आणि तरुणांनी पारंपरिक कुर्ते परिधान करून गणरायाच्या आगमनाचे विशेष रिल्स आणि फोटोशूट केले.
------
सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे देखरेख
अनेक मंडळांनी डिजिटल स्क्रीन आणि ऑनलाइन आरतीची सोय केल्यामुळे ग्रामीण भागातही हायटेक वातावरण पाहायला मिळत आहे. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जात आहे.