गणेशोत्सव परंपरांचे होणार
डिजिटल दस्तऐवजीकरण
शशांक काळे यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १४ : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित केलेल्या या पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील ३५ हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअॅप व ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाच्या या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तीकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या डिजिटल अभियानात सहभागी होऊन आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या परंपरा जतन करण्यासोबतच नागरिकांचा या सांस्कृतिक लोकचळवळीत सक्रिय सहभाग वाढणार आहे.