अभियंता दिन विशेष
---------
२९६७१
हरिभाऊ गिते
भारताच्या प्रगतीचे निःशब्द शिल्पकार : अभियंते
दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होणारा ''अभियंता दिन'' हा केवळ दिनदर्शिकेतील एक औपचारिक दिवस नव्हे, तर आधुनिक भारताच्या उभारणीत स्वतःचे आयुष्य समर्पित करणाऱ्या सर्जनशील हातांचा गौरव करण्याचा क्षण आहे. हा दिवस महान भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीचे स्मरण करून देतो. अभियांत्रिकी म्हणजे निव्वळ उपजीविकेचे साधन किंवा व्यावसायिक कौशल्य नसून ती समाजाप्रति असलेली एक नैतिक बांधिलकी आहे, याचा वस्तुपाठ सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याने घालून दिला.
१८६१ मध्ये एका अत्यंत साध्या कुटुंबात जन्मलेले सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या दूरदृष्टीने भारताच्या औद्योगिक व जलसंपदा क्षेत्राला नवी दिशा दिली. हैदराबादमधील ऐतिहासिक पूरनियंत्रण प्रणाली, कर्नाटकातील भव्य कृष्णराज सागर धरण, स्वयंचलित पूरदरवाजांचे तंत्रज्ञान आणि नियोजित अर्थव्यवस्थेचा आग्रह यातून त्यांनी तांत्रिक स्वावलंबनाची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्या याच अद्वितीय राष्ट्रकार्याला वंदन म्हणून १९५५ मध्ये देशाने त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवले.
वाढत्या शहरीकरणाचा ताण, हवामान बदलामुळे निर्माण होणारे जलसंकट आणि नैसर्गिक आपत्ती यावर शाश्वत उपाय शोधणे ही काळाची गरज बनली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनमुळे पारंपारिक कौशल्यांची व्याख्या बदलत असून, नव्या पिढीला केवळ तांत्रिक ज्ञान असून चालणार नाही; तर विश्लेषक विचारसरणी, संवेदनशीलता आणि वेगवान बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करावी लागेल.
शाश्वतता आणि मूल्यांची बांधिलकी
अभियांत्रिकी ही निव्वळ नफा-तोट्याची गणितं मांडणारी विद्या नाही, तर ती मानवी जीवनाची सुरक्षितता जपणारी नैतिक जबाबदारी आहे. म्हणूनच भविष्याची पायाभरणी करताना प्रत्येक प्रकल्प पर्यावरणाशी सुसंगत आणि शाश्वत असायला हवा.
भारत आज एका निर्णायक वळणावर उभा आहे. कार्बन न्यूट्रॅलिटीचे उद्दिष्ट असो, ग्रामीण भागातील जलसुरक्षा असो वा शहरांचे आधुनिक नियोजन या प्रत्येक टप्प्यावर अभियंत्यांची भूमिका मध्यवर्ती राहील. फलकांवर कधीही नाव न झळकवता राष्ट्राचा कणा मजबूत करणाऱ्या या निःशब्द शिल्पकारांना अभियंता दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
- हरिभाऊ कारभारी गिते, मुख्य अभियंता,
मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र राज्य