मेनफिचर
शहर टुडे पान चारसाठी
---------------------
फोटो संधिपाल वानखेडे देणार आहेत
जळगाव :
--------------------
दीड दिवसाच्या गणरायाला निरोप
------
जळगावच्या मेहरुण तलावात भाविकांकडून भक्तिभावाने विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१५ : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात शहरातील दीड दिवसाच्या गणरायाला मंगळवारी (ता.१५) भावपूर्ण निरोप देण्यात आला. विविध घरांत व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तींचे मेहरुण तलावावर भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. यावेळी भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करीत गणरायाला निरोप दिला.
श्रीगणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करून आरती, पूजा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दीड दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची लगबग सुरू झाली. दुपारनंतर मेहरुण तलावाच्या परिसरात गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी गणरायाला निरोप देण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला. अनेक कुटुंबांनी पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्ती मिरवणुकीत नेली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. काही ठिकाणी ढोल-ताशा पथकांच्या वादनाने वातावरणात उत्साह निर्माण झाला, तर महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत गणरायाला निरोप दिला.
.......
तलावावर विशेष व्यवस्था
गणेशमूर्ती विसर्जनासाठी मेहरुण तलाव परिसरात महापालिका प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली होती. भाविकांना विसर्जनाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सुरक्षेची व गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी तलाव परिसरात स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात होते. निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्माल्य पाण्यात न टाकता उपलब्ध संकलन केंद्रांत जमा करण्यास प्राधान्य दिले.
.......
भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देताना अनेक भाविक भावूक झाले. घरातील गणपतीची आरती करून कुटुंबीयांनी मूर्ती विसर्जनासाठी नेली. विसर्जनापूर्वी गणरायाला नैवेद्य दाखवून पुढील वर्षी सुख-समृद्धीसह पुन्हा आगमन करण्याची प्रार्थना करण्यात आली. विसर्जनाच्या वेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणांनी मेहरूण तलाव परिसर भक्तिमय झाला होता. शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला.