फोटो ः कमळाबाई वळवी - SAT26B10577
----------------
पती-पत्नीचे भांडण सोडविणाऱ्या आईचा खून
दारूच्या नशेत मुलाचे कृत्य ः पत्नीने पिठलं न केल्याने भांडण
--------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक-सातपूर, ता. १५ ः गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोतीवाला वैद्यकीय महाविद्यालयामागे असलेल्या हनुमाननगरमध्ये सोमवारी (ता. १४) मध्यरात्रीच्या सुमारास मद्यपी मुलानेच जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तानाजी अनाजी वळवी (वय ४०, रा. हनुमाननगर) असे त्याचे नाव आहे. कमळाबाई अनाजी वळवी (६५, रा. हनुमाननगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. मृत कमळाबाईची मुलगी हिराबाई भगवान गावित यांच्या फिर्यादीनुसार, संशयित तानाजी हा सातूपर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत हेल्पर आहे. तो सोमवारी (ता. १४) रात्री मद्याच्या नशेत घरी आला, त्याने पत्नीला पिठलं बनविण्यास सांगितले असता तिने ते न बनविल्याने तो तिला मारहाण करीत होता. घरात असलेली आई कमळाबाई वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना, संशयित तानाजीने घरातीलच कुऱ्हाडीने थेट आईच्या डोक्यात घाव घातला. घाव वर्मी बसल्याने ती जागेवरच कोसळली. ही घटना मध्यरात्री साडेबारा-एकच्या सुमारास घडली होती.
गंभीर जखमी आणि अतिरक्तस्राव झाल्याने तिची नात सोनाथी डबाळे (ता. द्वारका), नातू दौलत गावित यांनी त्यांना मंगळवारी (ता. १५) सकाळी साडेदहाच्या सुमारास बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ. श्रीमती गावित यांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच, गंगापूरचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड पथकासह हनुमाननगर येथील घटनास्थळी दाखल झाले. गंगापूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित तानाजी वळवी यास अटक करण्यात आली आहे.
--------------