दोन दिवसांच्या पावसानंतर उन्हाचा चटका
------
उकाड्यातही वाढ; जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस नाही
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी(ता.१४) सकाळपासूनच सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने कडक उन्हाचा चटका जाणवू लागला. मंगळवारीदेखील हीच परिस्थिती असून भाद्रपद महिन्यातील उन्हाचा चटका आता जाणवू लागला आहे. अधूनमधून काही काळ ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेल्याने उकाडाही निर्माण झाला.
दोन दिवसांपूर्वी अर्थात शनिवार व रविवारी जिल्ह्यातील विविध भागांत पाऊस झाला. काही भागांत जोरदार पाऊस झाल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून थंडावा जाणवत होता. याशिवाय शेतशिवारातही ओलावा निर्माण झाला. खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पावसानंतर लगेचच उन्हाची तीव्रता वाढली. दोन दिवसांपासून तापमान वाढले असून, ३२ अंशांवर तापमान पोहोचले आहे.
अजूनही पावसाची गरज
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. साधारण महिनाभर पावसाने दडी मारल्याने शुक्रवारी (ता.११) पावसाचे आगमन झाले. सलग दोन दिवस दमदार पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला आहे. दरम्यान, काही वेळ ढगाळ वातावरण, त्यानंतर पाऊस व पुन्हा कडक ऊन असे वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी होत असली तरी पाऊस येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अजूनही पावसाची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आगामी पावसाकडे आहे.
आर्द्रतेत वाढ
दोन दिवसांच्या पावसानंतर वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यातच मंगळवारी (ता.१५) सकाळपासून उन्हाचा चटका अधिक प्रमाणात जाणवू लागल्याने उकाड्यात वाढ झाली. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. तापमानात वाढ झाल्याने उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाली. रात्रीचा उकाडाही वाढल्याने अस्वस्थता जाणवू लागली आहे.