‘श्रीगणेशा आरोग्याचा’
अभियानांतर्गत शिबिरे
डॉ. तुषार धामणे यांची माहिती
नंदुरबार, ता. १५ : गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात २५ सप्टेंबरपर्यंत ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ. तुषार धामणे यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणीसह आवश्यक उपचारांची सुविधा या शिबिरांमध्ये मिळणार आहे. आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ईसीजी, विविध निदानात्मक व उपचारात्मक तपासण्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचाराची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे अधिकारी व समन्वयक यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. विविध संस्था व आरोग्य यंत्रणांचा सहभाग जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्न रुग्णालये, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, डी. पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, पथराई, धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालयांच्या संयुक्त सहकार्याने या शिबिरांचे आयोजन केले आहे.