दोन कॉलम
----------
यशस्वी जीवनासाठी स्वतःवर
नियंत्रण गरजेचे : शोभा शिंदे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : यशस्वी जीवनासाठी स्वतःच्या भावना ओळखणे, त्यांचे नियंत्रण करणे व इतरांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला तरी शिक्षणप्रक्रियेत शिक्षकांचे महत्त्व कायम राहणार असून, तंत्रज्ञान आपल्यावर हावी होऊ नये, असे मत डॉ. शोभा शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रात ‘इंडक्शन प्रोग्राम’अंतर्गत मंगळवारी (ता.१५) ‘स्वयंमूल्यांकनातून स्वतःचा शोध, जाणिवांचा जागर’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. शिंदे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे होते.
स्वतःची ओळख, स्व-जाणीव, भावनिक बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, सकारात्मक विचार व अपयशातून शिकण्याचे महत्त्व डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी समस्यांशी संघर्ष करून निरंतर प्रयत्न करीत राहावे. स्वतःच्या चुका व उणिवा ओळखून त्यावर मात केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले. डॉ. पगारे यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यांकन, आत्मचिंतन व स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. चांगली संगत, स्वच्छ विचार, शिक्षकांशी संवाद व संत-महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळू शकते, असे नमूद केले. कार्यक्रमास डॉ. दीपक खरात, डॉ. सुदर्शन भवरे, प्रा. प्रतिभा गलवाडे, सहयोगी निखिल तायडे, महेश सूर्यवंशी, संशोधक विद्यार्थी खेमराज पाटील, सुकन्या जाधव, शिक्षकेतर कर्मचारी व प्रशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. प्रीती सोनी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थिनी हर्षदा महाजन यांनी आभार मानले.