CSG26B02906
चाळीसगाव ः एकदंत गणेश मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण व गणेशभक्त.
---
GPR26B06156
गणपूर (ता. चोपडा) ः विघ्नहर्ता गणेश मंडळाची मूर्ती.
---
POL26B15582
टिटवी (ता. पारोळा) ः ‘एक गाव- एक गणपती’ मंडळाच्या श्री गणेशाची मूर्ती.
---
DIH26A01886
दहिगाव (ता. यावल) ः ‘एक गाव- एक गणपती’ मंडळाच्या स्थापनेप्रसंगी पूजन करताना दांपत्य.
---
जिल्ह्यात गणेशभक्तांची मांदियाळी
---
प्रचंड उत्साह; ठिकठिकाणी विविध कार्यक्रम सुरू
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. १५ ः जळगाव जिल्ह्यात बुधवारी (ता. १४) श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. सवाद्य मिरवणुकांमध्ये फुलांची उधळण करून मंडळे व घरोघरी गणपतीची स्थापना करण्यात आली.
चाळीसगावात स्थापना
शहरासह तालुक्यातील १५७ मंडळांत ‘श्रीं’ची स्थापना झाली आहे. साधारणपणे पाच हजार शाडू मातीच्या मूर्तींची स्थापना घरोघरी झाली. मानाचा ‘चाळीसगावचा राजा’ नेताजी पालकर चौकाची मिरवणूक लक्षवेधी ठरली. मोठ्या मशिदीवरून मिरवणूक निघाली. सकाळी अकराला सुरू झालेली मिरवणूक दुपारी चारपर्यंत सुरू होती. कोपरगाव येथील महिलांच्या ढोलपथकाच्या शिस्तबद्ध वादनाने आणि लेझीमच्या ठेक्याने परिसर दुमदुमला होता. शहरात एकूण ६०, तर ग्रामीण भागात ९७, अशा एकूण १५७ सार्वजनिक मंडळांनी श्रीगणेशाची विधिवत स्थापना केली. बहुतांश मंडळांचे गणपती १० ते १५ फुटांपेक्षा जास्त उंचीचे आहेत.
एकदंत महोत्सव
एकदंत गणपतीची मिरवणूक खरजई नाक्यापासून जल्लोषात निघाली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे एकदंत गणपती महोत्सव सुरू झाला असून, यंदाचे आठवे वर्षे आहे. मंडळाने २१ फूटाची मूर्ती स्थापन केली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून बक्षिसे दिली जाणार आहेत. मिरवणुकीत हनुमानाची झांकी, अघोरी नृत्यकला, तात्या विंचू आणि गोरिला हे विशेष आकर्षणे ठरली. गलंगी येथील दीपक बॅन्डच्या गजराने मिरवणुकीत उत्साह निर्माण केला. भक्ती, संस्कृती, कला आणि चाळीसगावकरांचा उत्साह यांचा सुंदर संगम असलेला हा उत्सव यंदाही अविस्मरणीय व्हावा, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.
---
गणपूरला दहा मंडळांतर्फे स्थापना
गणपूर (ता. चोपडा) : येथे दहा मंडळांकडून ढोलताशांच्या निनादात गणरायाची स्थापना करण्यात आली. फ्रेंड्स क्लब, विघ्नहर्ता ग्रुप, न्यू प्लॉट, एकलव्य व इतर गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. रोज सकाळी व सायंकाळी होणाऱ्या पूजेनंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. विजेत्यांना बक्षिसेही दिली जाणार आहेत.
---
टिटवी येथे एक गाव एक गणपती
पारोळा : तालुक्यातील टिटवी गावात ‘एक गाव- एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रक्तदान, आरोग्य शिबिर, वृक्षलागवड, स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांसाठी टिटवीतील युवकांसह ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे.
---
दहिगावला ‘एक गाव एक गणपती’
दहिगाव (ता. यावल) : येथील श्री महादेव हनुमान मंदिराच्या आवारात यंदाही ‘एक गाव- एक गणपती’ची स्थापना झाली आहे. दहा दिवसांत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, या दृष्टीने संगीत खुर्चीसह इतर विविध स्पर्धा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
---
दीपनगरला विविध कार्यक्रम
दीपनगर (ता. भुसावळ) : औष्णिक विद्युत केंद्रात सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे २५ सप्टेंबरपर्यंत रोज कीर्तन, संगीतमय सुंदरकांड, विविध खेळ, निबंध स्पर्धा, ‘बुगी-बुगी’, आनंद मेळावा व हौजी गेम, चित्रकला स्पर्धा व होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आदी कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी (ता. २३) सत्यनारायण पूजा, प्रसादवाटप तसेच बक्षीस वितरण, गुरुवारी (ता. २४) ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे’ या दर्जेदार मराठी नाटकाचे सादरीकरण होईल. गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी विसर्जन मिरवणुकीने होईल.