फोटो : NSK26H29752
नंदुरबार : पोलिस पथकाने हस्तगत केलेले विद्युतपंप.
------------------------
विद्युतपंप चोरणारी टोळी ताब्यात
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १५ : शेतातील विद्युतपंप चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे पाच विद्युतपंप हस्तगत केले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी एक विशेष पथक तयार करुन त्यांना शेतकऱ्यांच्या शेतातील शेती अवजारे, साहित्य, विद्युतपंप चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने संशयितांचा शोध घेऊन गणेश आप्पा भिल (वय ३०), सोमा गोमा भिल (वय २८), बादल मनोज भिल (वय २१), समाधान रवींद्र भिल (वय २०, सर्व रा. खोकराळे, ता. जि. नंदुरबार) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून एकूण ८५ हजार ९०० रुपये किमतीच्या एकूण पाच विद्युतपंप व वायर हस्तगत करण्यात आली. तसेच, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यातील अभिलेखावरील शेती साहित्य चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडीस आले आहेत. नंदुरबार जिल्हा अभिलेखावरील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलिस हवालदार दिनेश चित्ते, सजन वाघ, मुकेश तावडे, ज्ञानेश्वर पाटील, दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, पोलिस अंमलदार सचिन सैंदाणे, यशोदिप ओगले, राहुल पांढारकर यांच्या पथकाने कारवाई केली.