चोरी गेलेल्या बुलेटसह
संशयित ताब्यात
नंदुरबार : शहरातील गांधीनगर परिसरातून अज्ञात चोरट्याने रॉयल एनफिल्ड कंपनीची एक लाख ५० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल चोरी करून नेली होती. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा तसेच संशयिताचा तपास सुरू केला. या दरम्यान मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात सुरज सुनील अहिरे (वय ३४) व २) सुनील अहिरे (दोन्ही रा. ओम साई राम नगर, दशरथ नगरजवळ, रामानंद पोलिस स्टेशन रोड, जळगाव, ता. जि. जळगाव, हल्ली मुक्काम संजय नगर, नंदुरबार) या संशयितांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी सुरज अहिरे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याकडून हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकलदेखील मिळून आली. पोलिस हवालदार विशाल नागरे तपास करीत आहेत. पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकातील नंदुरबार शहराचे पोलिस उपनिरीक्षक भुनेश मराठे, पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलिस हेडकॉन्स्टेबल विशाल नागरे, जगदीश पाटील, आनंदा मराठे, राहुल राठोड, ललित गवळी, अमित भरवाड, विनोद महाजन, विद्धेश्वर बिरारी, अनिल वसावे व विवेक ठाकरे यांनी ही कारवाई केली.