‘नासाका’च्या बैठकीस भाडेधारकच अनुपस्थित
--------------
कृती समिती, लोकप्रतिनिधींची नाराजी ः उद्या पुन्हा बैठक होणार
-------------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : पळसे येथील नाशिक साखर कारखान्याकडील शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी तसेच वीजबिल थकबाकीवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी (ता.१५) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. पण कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी गैरहजर असल्याने बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे गुरुवारी (ता. १७) दुपारी चारला पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. त्यावेळी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे व भास्कर भगरे तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व नासाका कृती समितीचे विष्णूपंत गायखे तसेच शेतकरी उपस्थित होते. कारखाना कृती समितीने बैठकीत शेतकरी व कामगारांच्या थकीत रकमेची माहिती सादर केली. त्यामध्ये मागील गळीत हंगामातील सुमारे ९०० शेतकऱ्यांचे ३ कोटी ९० लाखांचे देणी बाकी आहे. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे दीड कोटींचे वेतन थकीत असून गेल्या सहा महिन्यापासून १५ लाखांचे वीजबिलही थकीत आहे. परिणामी कारखाना परिसरात अंधाराचे साम्राज्य असून, त्याचा गैरफायदा घेऊन यंत्रसामग्री, लोखंडी साहित्य आणि अन्य मालमत्तेची चोरी होऊ शकते अशी भिती कृती समितीने बैठकीत व्यक्त केली.
नासाकासंदर्भातील बैठकीला मूळ भाडेधारक उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकप्रतिनिधी, कृती समिती तसेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यासर्व पार्श्वभूमीवर नासाकाप्रश्नी अंतिम तोडगा काढण्यासाठी गुरुवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेतला जाईल. त्या वेळी भाडेधारकास उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---
जिल्हा बँकेची १३२ कोटी थकबाकी
नाशिक साखर कारखाना २०१३ मध्ये बंद पडला, तेव्हा जिल्हा बँकेचे सुमारे ८४ कोटींचे कर्ज कारखान्याकडे थकीत होते. आजमितीस थकबाकी १३२ कोटींवर पोचल्याची माहिती कृती समितीने दिली. यादरम्यान, कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अॅण्ड एनर्जी लिमिटेड संस्थेने कारखान्यातील तयार साखर, मोलॅसिस, भुसा आणि राख यांची विक्री केली. करारातील अटींचा भंगप्रकरणी जिल्हा बँकेने या संस्थेला करारनामा रद्द केल्याची कायदेशीर नोटीसही बजावल्याची माहिती कृती समितीने बैठकीत दिली.
--------------