जिल्हावासियांनो, आधार अद्ययावत करावे
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : २ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर याकाळात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आधार कार्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
सेवा पंधरवाड्यअंतर्गत प्रशासनातर्फे जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी मंगळवारी (ता.१५) बायोमेट्रिक पद्धतीने त्यांचे आधार कार्डावरील माहिती अद्ययावत करत या मोहिमेचा शुभारंभ केला. सेवा पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यातील सर्व अधिकृत आधार नोंदणी केंद्रांवर नागरिकांना त्यांची माहिती अद्ययावत करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांत आधार अपडेट केलेले नाही, त्यांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा.
आधार कार्ड अद्ययावत ठेवल्याने सर्व प्रकारच्या शासकीय योजना, डीबीटी आणि डिजिटल सेवांचा लाभ सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कळविले आहेे.
---
दर पाच वर्षांनी बायोमेट्रीक
नागरिकांनी त्यांच्या आधारवरील बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट, आयरीस व छायाचित्र) तसेच इतर वैयक्तिक माहिती वेळेवर अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांची ओळख अधिक सुरक्षित राहावी. तसेच सरकारी योजनांचा लाभ विनाअडथळा मिळावा, या उद्देशाने दर पाच वर्षांनी नागरिकांनी आपली बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करावी, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
-----------------
---------------
-------------
फोटो क्रमांक : एच-29755