नितीन उपासनीचा मुक्काम ‘कारागृहात’च
शालार्थ आयडी घोटाळा : नाशिकरोड न्यायालयाने ‘जामीन’ फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य संशयित व सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी याचा जामीन अर्ज नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्यांचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. याचप्रकरणी धुळ्यातून अटक केलेला माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्या जामिनावर येत्या १८ तारखेला सुनावणी आहे.
....
उपासनी हा गेल्या नऊ महिन्यांपासून कोठडीत आहेत. त्याने वैद्यकीय कारणास्तव नाशिकरोड कनिष्ठ व नंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वीच त्याचा अर्ज फेटाळून लावला होता. दोन महिन्यांपासून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज प्रलंबित होता. सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयासमोर झालेला होता. त्यावर मंगळवारी (ता. १५) सुनावणी होऊन न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुे उपासनीचा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
या घोटाळ्याचा तपास शहर गुन्हेशाखेचे विशेष पथक व सहायक आयुक्त संदीप मिटके करीत आहेत. यात सुमारे १२४ प्रकरणांमध्ये अधिकृत नोंदी व प्रत्यक्ष डेटामध्ये विसंगती असून एकाच जावक क्रमांकावर विविध नावांचे आदेश जारी झाले आहेत. फसवणूक करणारे आर्थिक गुन्हे समाज विघातक ‘व्हाइट कॉलर क्राईम’च्या श्रेणीत येत असल्याचे निरीक्षक अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वीच नोंदविले आहे. या गुन्ह्यात नाशिक विभागातील ८४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बनावट असून त्यापैकी तब्बल ६३८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जळगाव जिल्ह्यातील असल्याचे तपासातून समोर आलेले आहे.
१६-१ चौकट
आठ जण अटकेत
उपासनीसह किरण पाटील, राहुल पवार, शिक्षण संस्थाचालक व मध्यस्थ प्रशांत वाडीले, माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, शिक्षण संस्थाचालक व भाजप पदाधिकारी संजय गरूड, त्याचा भाऊ दीपक गरूड, लॅब असिस्टन्ट तुषार साळुंके या आठ संशयितांना अटक करण्यात आलेली आहे.
.....
‘हायकोर्टा’तही आज सुनावणी
या प्रकरणाशी संबंधित १४ संशयितांनी नाशिकरोड अतिरिक्त न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. संशयित भाऊसाहेब चव्हाण, मीनाक्षी गिरी, प्रदीप शिंगणे, अतुल पवार, राहुल पवार, उमेश पवार, मनीष कदम, किरण कुवर, प्रवीण अहिरे, भास्कर पाटील, देविदास महाजन, अविनाश पाटील, मनोज पाटील, शरद शिंदे यांचे अटक पूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे अटकेपासून बचावासाठी या संशयितांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर बुधवारी (ता. १६) सुनावणी आहे. याकडेही शिक्षण विभागाचे लक्ष लागून आहे. यातील बहुतांशी संशयित हे पसार असून, शहर गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक संशयितांच्या मागावर आहेत.