‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीला
३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना जुन्या पद्धतीने तिकीट
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेली ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सक्ती आता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एनसीएमसी प्रणालीवर मोठ्या प्रमाणात प्रवासी व्यवहार होत असल्याने सर्व्हरवरील वाढलेला ताण, नेटवर्क व तांत्रिक अडचणींमुळे सवलतीचे तिकीट काढताना अडथळे येत असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर अनेक ठिकाणी कार्ड सक्रिय नसणे, कार्ड वाचले न जाणे, ई-तिकीट यंत्रात अडथळे येणे तसेच सर्व्हरशी संपर्क न झाल्याने व्यवहार रखडणे, अशा समस्या प्रवाशांना जाणवत आहेत. काही ठिकाणी कार्ड वितरण व नोंदणीची प्रक्रियाही अपेक्षित वेगाने न झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. परिणामी, सवलतीचा लाभ घेण्यासाठी पात्र असतानाही काही प्रवाशांना पूर्ण तिकीट काढण्याची वेळ आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबरपर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीने सवलतीचे तिकीट देऊन एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अद्याप एनसीएमसी कार्ड नाही, त्यांनी या कालावधीत सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
चौकट
कार्ड काढण्याचे आवाहन
दरम्यान, ज्या प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड तयार होऊन सक्रिय झाले आहे, त्यांनी शक्यतो कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी अद्याप एनसीएमसी कार्ड काढलेले नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी अधिकृत एजंटकडून कार्ड काढून ते सक्रिय करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.