चॉपरचा धाक दाखवून हप्ता वसुली
तिघा सराईतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : रविवार पेठ परिसरातील गंगावाडी येथे गणेशोत्सवाचा देखावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांना धाक दाखवून जबरदस्तीने खंडणी वसुली करण्याचा प्रकार घडला आहे. चॉपर व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम लुटण्यासह रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करत दगडफेक केल्याची घटना घडली असून, यात दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवधूत जाधव, जयेश जाधव, राहुल दिघे व रोशन गांगुर्डे अशी संशयितांची नावे आहेत. विशाल चंद्रकांत आहेर (४१, रा. आहेर भवन, गंगावाडी, रविवार पेठ) यांच्या फिर्यादीनुसार, गंगावाडी भक्त मित्रमंडळाच्या देखाव्याजवळ गर्दी असताना संशयितांनी शिवीगाळ करत उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता, गाड्या पार्क करण्यासाठी दरमहा २ हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली. तसेच, मंडळाने यंदा गणपतीचा हप्ता दिला नाही'' असे म्हणत संशयितांनी चॉपर व चाकूचा धाक दाखवून फिर्यादी विशाल आहेर यांच्या खिशातील बाराशे रुपये बळजबरीने काढून घेतले. त्याच वेळी शुभम मेटकर या कार्यकर्त्याला चाकूचा धाक दाखवून ५०० रुपये हिसकावले व प्रतिकार केला असता त्याला दगडाने मारहाण करून जखमी केले. यानंतर राहुल दिघे याने जिवे मारण्याची धमकी दिली आणि रस्त्यावरील दगड मारण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत फिर्यादी व इतर तरुण जखमी झाले आहेत. निघून जाताना संशयितांनी दोन दुचाकी (एमएच १५ डीपी ०१७१, एमएच १५ डीडी ६६६४) व इतर ४ ते ५ सायकलींची तोडफोड करून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डगळे करीत आहेत.