पाचव्या, सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी वाहतुकीत बदल
पर्यायी मार्गांचा करावा अवलंब करण्याचे वाहतूक शाखेकडून आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : पाचव्या (ता. १८) आणि सातव्या दिवशी (ता. २०) होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका आणि दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांनी मार्गात महत्त्वाचे बदल केले आहेत. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ या भागांत संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी अधिसूचना जारी करीत पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक नियम व निर्बंध हे पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच परिस्थितीनुसार वाहतुकीत ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार पोलिसांनी राखून ठेवले आहेत. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटर वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. १८, २० सप्टेंबरला दुपारी दोनपासून ते मध्यरात्री बारापर्यंत शहरातील काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहने, एसटी बस आणि सिटीलिंक बससाठी प्रवेश बंद राहणार आहे.
--
हे मार्ग राहतील बंद; दुपारी २ ते रात्री बारापर्यंत
- निमाणी ते रविवार कारंजा मार्ग : निमाणी बसस्थानकावरून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड व रविवार कारंजा मार्गाने जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळ व सिटीलिंक बसस आणि सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद राहील.
- अशोकस्तंभ ते पंचवटी कारंजा मार्ग : सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बस व इतर जड वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
--
पर्यायी मार्ग :
-निमाणीकडून जाणाऱ्या वाहनांसाठी : निमाणी मार्गावरील प्रवेशबंद असलेली वाहने काट्या मारुती चौक, संतोष टी पॉइंट, कन्नमवार पूल आणि द्वारका सर्कल मार्गाने नाशिक रोड, अंबड, सातपूर व इतर भागांत वळवण्यात आली आहेत.
-सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी : ही वाहने अशोकस्तंभ, रामवाडी पुल, मखमलाबाद नाका, पेठ नाका सिग्नल आणि दिंडोरी नाका मार्गे निमाणी स्टॅन्ड, पंचवटीकडे जातील.
-नाशिक रोड, अंबड, सातपूरकडे जाणारी वाहने : काठ्या मारुती चौक - विश्वकर्मा चौक - कन्नमवार पूल - द्वारका मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील.