NSK26H29772
जळगाव : महामार्ग क्रमांक ५३ च्या नालेकामाची चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना माजी नगरसेवक रियाज बागवान.
.........
महामार्गावरील नालेकामाची चौकशी करा
सेवा रस्त्याचे काम निकृष्ट; माजी नगरसेवक बागवान यांचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अजिंठा चौक ते ममता हॉस्पिटल परिसर तसेच मलिकनगर नाल्यापर्यंत सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या कामात तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक रियाज बागवान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या संपूर्ण कामाची तांत्रिक व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी निचरा व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने करणे आवश्यक असताना संबंधित कामात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात सेवा रस्त्यासह मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, पाण्याखाली खड्डे झाकले जात असल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण होत असल्याचे बागवान यांनी म्हटले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
या महामार्गावरील अजिंठा चौफुली, ममता हॉस्पिटलजवळील नाला आणि मेहरूण परिसरात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ता सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम झाले आहे का, तसेच निचरा व्यवस्था कोणाच्या मंजुरीने करण्यात आली, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकट
यापूर्वी देखील तक्रार
यापूर्वीही संबंधित विभागाकडे तक्रार करून काम थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली होती; मात्र समस्येचे कायमस्वरूपी निराकरण झाले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेऊन चौकशी करून निष्कर्षानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे बागवान यांनी माहिती दिली आहे.