फोटो : NSK26H29782
नंदुरबार : मुर्शिदाबाद येथे निर्मल आरंभीचा सत्कार करतांना मान्यवर.
----------------------
जलतरण स्पर्धेत नंदुरबारच्या निर्मल आरंभीचा विक्रम
८१ किलोमीटरचे अंतर १२ तास २३ मिनिटात केले पार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार : पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद जलतरण संघटना आणि भारतीय जलतरण संघटनेच्या विद्यमाने आयोजित ८० व्या जागतिक लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेत नंदुरबार येथील युवा जलतरणपटू निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी याने ऐतिहासिक कामगिरी करीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
निर्मलने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत ८१ किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ तास २३ मिनिटांत पोहून पूर्ण केले. शारीरिक-मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या आव्हानात्मक स्पर्धेत त्याने दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक केले जात आहे. १२ तास २३ मिनिटात ८१ किलोमीटरचे अंतर सामान्य व्यक्तीसाठी चालत पूर्ण करणेही अत्यंत कठीण असताना निर्मलने हे पाण्यात पोहत अल्पावधीत पूर्ण करून एक नवा विक्रम नोंदविला आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू होण्याचा मान निर्मलने मिळवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रथम जलतरणपटू म्हणून निर्मलच्या नावाची विशेष नोंद झाली आहे. त्याच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. निर्मल याने स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव व सी.बी. वॉटर पार्क येथे सराव केला आहे. दुरुस्तीच्या कामासाठी जलतरण तलाव बंद असतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सी. बी. वॉटर पार्क येथे सरावाची सोय करुन दिली होती.
निर्मलच्या या यशामागे प्रशिक्षक राहुल काळे, अमोल भोयर यांचे मार्गदर्शन, पालक भूपेंद्रसिंग आरंभी यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ लाभले.