धुळे : टुडे पान १ साठी...
--
फोटो क्रमांक : 29796
बर्डीपाडा (ता. साक्री) : गणेशोत्सवानिमित्त वारली पेंटिंग, निसर्गदेवता, तांब्या-पितळेची जुनी भांडी आणि गणरायाच्या चरणी केलेले सप्तधान्यांचे ‘कन्सरा पूजन’ यातून साकारलेली पारंपरिक आदिवासी संस्कृतीची आरास. (छायाचित्र : भिलाजी जिरे)
--
गणेशोत्सवाच्या मंचावर आदिवासी जीवनशैलीचा पट
--
बर्डीपाड्यात आराशीत कन्सरा पूजन; सप्तधान्य पूजनाने निसर्गाशी नाते
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. १६ : गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच बर्डीपाडा (ता. साक्री) येथे आदिवासी संस्कृतीची समृद्ध, वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखी झलक पाहायला मिळत आहे. वाडवडिलांपासून जपलेला पारंपरिक वारसा, लोककला आणि निसर्गाशी असलेले अतुट नाते नव्या पिढीसमोर स्पष्टपणे यावे, या मूळ संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवात आदिवासी जीवनशैलीचा एक सुंदर व जिवंत देखावा साकारण्यात आला आहे.
-
स्थानिक चित्रकार राहुल शरद साबळे यांनी स्वतःच्या कल्पकतेतून आणि आस्थेने काढलेल्या विविध चित्रांमधून ही संपूर्ण आकर्षक आरास उभी केली आहे. आदिवासी समाजाच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र असलेल्या चंद्र, सूर्य, नागदेव आणि वाघदेव या निसर्गदेवतांना या देखाव्यात मोलाचे स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर आदिवासी संस्कृतीची ओळख असणारी पावरी, ढोल यांसारखी पारंपरिक वाद्ये आणि लोकनृत्यकलेची प्रतीके मांडून संस्कृतीचा लक्षवेधी जागर येथे करण्यात आला आहे. या आराशीमध्ये पूर्वीच्या काळात दैनंदिन वापरात असणारी तांब्या- पितळेची जुनी भांडी सुरेख रीतीने मांडण्यात आली आहेत. या वस्तूंच्या माध्यमातून जुन्या काळातील साधी पण समृद्ध जीवनशैली कशी होती, याची आठवण नागरिकांना करून दिली जात आहे.
-
धान्यसंस्कृती आणि निसर्गपूजा
या देखाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेती आणि अन्नाचा सन्मान करणारे ‘कन्सरा पूजन’. यामध्ये नागली, ज्वारी, बाजरी, गहू, उडीद, कुळीथ आणि भात या सात धान्यांची शास्त्रोक्त मांडणी करून पूजनाचा विधी पार पाडण्यात आला आहे. या माध्यमातून शेती, अन्नधान्य आणि निसर्गाशी असलेले मानवाचे पारंपरिक नाते अधिक दृढ केले आहे. गणपती बाप्पाच्या चरणी आपल्या मूळ देवदेवतांची पूजा, लोककला आणि कृषी संस्कृतीचा हा अद्भुत मिलाफ पाहून बर्डीपाडा तसेच, परिसरातील नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या माध्यमातून आपल्या मातीचा, संस्कृतीचा आणि पूर्वजांचा वारसा नव्या पिढीसाठी जतन करण्याचा आदर्श या उपक्रमाने निर्माण केला आहे.