हस्ती बँकेकडून सभासदांना अतिरिक्त पाच टक्के लाभांश
---
५५ व्या वर्धापन दिनानिमित्त लाभ; बँकेचा २० लाभांश, सभासदांना थेट फायदा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : उत्तर महाराष्ट्रात उत्कृष्ट सेवेचा ठसा उमटवणाऱ्या दोंडाईचास्थित हस्ती बँकेने ५५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या सुवर्णमयी पर्वानिमित्त बँकेने सभासदांना अतिरिक्त पाच टक्के लाभांशाची (डिव्हिडंड) भेट दिली आहे. या निर्णयामुळे सभासदांना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एकूण २० टक्के लाभांशाचा थेट फायदा मिळाला आहे.
बँकेचे आधारस्तंभ कांतिलाल जैन यांनी सभासद हाच बँकेच्या प्रगतीचा खरा भागीदार आहे, या विचारातून लाभांश देण्याची परंपरा सुरू केली होती. तोच विश्वासाचा वारसा पुढे नेत विद्यमान अध्यक्ष कैलास जैन यांच्या नेतृत्वात बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांच्या आर्थिक हिताला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे हस्ती बँकेने सलग ३३ वर्षांपासून सातत्याने १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा जपली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष जैन यांच्या मार्गदर्शनात १५ टक्के नियमित लाभांशाचा प्रस्ताव मंजूर झाला होता आणि ती रक्कम तत्काळ सभासदांच्या खात्यात जमा केली होती. याच सभेत ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त पाच टक्के अतिरिक्त लाभांश देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)कडे प्रस्ताव पाठवून आवश्यक परवानगी मिळविली. मंजुरी मिळताच ५ सप्टेंबरला अतिरिक्त पाच टक्के लाभांशाची रक्कम सभासदांच्या खात्यात जमा झाली आहे. ५५ वर्षे ही सभासदांनी बँकेवर ठेवलेल्या विश्वासाची साक्ष आहे. अतिरिक्त लाभांश मिळाल्याने सर्व सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
---
कोट
सभासदांचे हित जोपासणे आणि बँकेच्या प्रगतीचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची परंपरा पुढेही कायम राहील. बँकेची आर्थिक सक्षमता, पारदर्शक कारभार, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परिश्रमामुळे हे यश मिळाले आहे.
-कैलास जैन,
अध्यक्ष, हस्ती बँक, दोंडाईचा