फुलपाट परिसरात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थ भयभीत
पालकमंत्र्यांचे सतर्कतेचे आवाहन; वनाधिकाऱ्यांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
पाळधी (ता. धरणगाव), ता. १६ : फुलपाट परिसरात बिबट्या दिसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असून, पिंजरा लावला आहे. दरम्यान, रात्री शेतात जाऊ नये व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
फुलपाट परिसरात एका शेतात बिबट्याने मेंढी फस्त केल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. याबाबत माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला व त्या ठिकाणी भेट देऊन नागरिक व शेतकऱ्यांना घाबरू नका, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
चौकट
बिबट्याच्या पायांचे आढळले ठसे
बुधवारी सकाळी वन विभागातील बळवंत पाटील, देवीदास जाधव व धोंडिबा पवार यांनी पाहणी केली असता, त्यांना बिबट्याचे ठसे दिसून आले. बिबट्या जवळपास दोन वर्षांचा असल्याचे ठशांवरून दिसत आहे. तेथे पिंजरा लावला असून, याच ठिकाणी धोंडिबा पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
कोट
पाळधी-फुलपाट रस्त्यावर बिबट्याच्या पायांचे ठसे दिसले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावले आहेत व वनपाल कर्मचारी धोंडिबा पवार लक्ष ठेवून आहेत. या परिसरात कुणीही जाऊ नये.
-देवीदास जाधव, वनपाल अधिकारी, एरंडोल
---
कोट
पाळधी-फुलपाट रस्त्यावरील जंगलात शनिवारी सहाच्या सुमारास मेंढ्या चारत असताना, अचानक बिबट्याने कळपातील एका मेंढीवर हल्ला केला. माझे वडील दगडू भोई यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. याबाबत वन विभागाला माहिती दिली असता, त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
-जितू भोई, प्रत्यक्षदर्शी