सिंहस्थातून नाशिकचे ब्रँडिंग करा
ब्रिजेश सिंह : माध्यम आराखड्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटनविषयक ओळख जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी व्यापक, तसेच प्रभावी आराखडा तयार करावा, असे निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले.
कुंभमेळा प्राधिकरण सभागृहात बुधवारी (ता. १६) माध्यम आराखड्यासंदर्भात आयोजित बैठकीप्रसंगी सिंह बोलत होते. या वेळी पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, इर्शाद बागवान व सागरकुमार कांबळे आदी उपस्थित होते.
ब्रिजेश सिंह म्हणाले, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर प्रभावी ब्रँडिंगसाठी पारंपरिक माध्यमांसोबत डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, दृकश्राव्य माध्यमे, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावरील विविध माध्यमांचा समन्वयित वापर करावा. त्यासाठी व्यापक आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या दीर्घकालीन विविध पायाभूत सोयीसुविधांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, असे निर्देश सिंह यांनी दिले. बैठकीनंतर त्यांनी रामतीर्थ परिसराला भेट देत पाहणी केली.
माहिती प्रभावीपणे मांडावी : सिंह
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची वैशिष्ट्ये, धार्मिक परंपरा, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबवावी. कुंभमेळानिमित्ताने नाशिक- त्र्यंबकेश्वरची स्वतंत्र पर्यटन ओळख निर्माण करावी. स्थानिक अध्यात्मिक ठिकाणे, कला, संस्कृती, खाद्य परंपरा, वारसा आणि पर्यटन स्थळांचे प्रभावी सादरीकरण करण्यावरही भर द्यावा. त्यासाठी विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती, साहित्य व सोशल मीडिया मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश ब्रिजेश सिंह यांनी दिले.
फोटो क्रमांक : एच-29814