दुर्लक्ष केले तर निलंबन, नाहीतर गडचिरोलीला बदली!
मंत्री अशोक उईके यांचा आश्रमशाळांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : आदिवासी वसतिगृहांतील असुविधांविरोधात आंदोलन सुरू असतानाच आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी बुधवारी (ता. १६) जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुविधा, आरोग्य आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केल्यास निलंबित करू, अन्यथा गडचिरोलीला बदली करू, असा थेट इशारा उईके यांनी दिला.
मंत्री उईके यांनी दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव शासकीय आश्रमशाळा तसेच सुरगाणा तालुक्यातील माणी उच्च माध्यमिक शाळा व वसतिगृहांना भेटी दिल्या. या वेळी आदिवासी विकास विभागाचे प्रभारी आयुक्त गोपीचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी काश्मिरा संखे, भाजप आदिवासी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस एन. डी. गावित, जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने मंत्र्यांचे स्वागत केले. उईके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सुविधांची माहिती घेतली. माणी येथे बोलताना ते म्हणाले, की आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी शासन मोठा खर्च करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी काम करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांच्या भवितव्याची पाहिलेली स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.
‘आपलीच मुले समजून सांभाळा’
आश्रमशाळेतील एखादी विद्यार्थिनी आजारी पडल्यास तिला तातडीने दवाखान्यात दाखल करण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. अशा प्रकरणात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांना माफ केले जाणार नाही, असा इशारा उईके यांनी दिला. शाळेतील अंतर्गत राजकारण, मतभेद अथवा कर्मचाऱ्यांमधील वादाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होता कामा नये. ‘राजकारण बाहेर करा; विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्या,’ असे खडे बोल त्यांनी सुनावले.
अनधिकृत गैरहजेरीबाबतही उईके यांनी कठोर भूमिका घेतली. तीन ते सात दिवस गैरहजर राहणे अथवा कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे खपवून घेतले जाणार नाही. केंद्रीय स्वयंपाकघरामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असल्यास त्याचीही जबाबदारी निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘मुलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला पगार मिळतो. त्यामुळे आपल्या कामाचे आत्मपरीक्षण करा, स्वतःमध्ये बदल घडवून आणा. आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थी विकसित झाला पाहिजे, हा संकल्प करा,’ असे आवाहनही उईके यांनी केले.