पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे भयावह वास्तव
सहा महिन्यांत १०० हून अधिक भोंदू बाबांवर गुन्हे दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१६ : राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला सहा महिने पूर्ण होत असतानाच, पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूगिरीचे अत्यंत भयावह वास्तव समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांत राज्यात शंभरहून अधिक भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे हे चित्र स्पष्ट झाले आहे.
भोंदू खरात प्रकरणानंतर महाराष्ट्र अंनिसने राज्यभरात ‘बुवाबाजी संघर्ष परिषदा’ घेऊन पीडितांना मोठे बळ दिले. त्यामुळे अनेक बाधित महिलांनी पुढे येत तक्रारी नोंदवल्या. दाखल गुन्ह्यांवरून ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. करणी-भानामती काढणे, अंगातील भूत उतरवणे, अघोरी पूजा, आजारपण किंवा कौटुंबिक अडचणी दूर करणे आणि पैशांचा पाऊस पाडणे अशा आमिषांना बळी पाडून ही फसवणूक केली गेली. यात आर्थिक लुटीसोबतच महिलांच्या शारीरिक शोषणाचे प्रमाण अत्यंत मोठे आहे.
विशेष म्हणजे सर्वच धर्मांतील भोंदू बाबांवर हे गुन्हे दाखल झाले असून, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम एकाच धर्मापुरते मर्यादित असल्याच्या आरोपांना यातून उत्तर मिळाले आहे.
जादूटोणाविरोधी कायदा २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात शासन यंत्रणा अपूर्ण पडत आहे. या कायद्याचे नियम अद्याप बनवले न गेल्याने पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवताना संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शासनाने तातडीने या कायद्याचे नियम बनवावेत आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात ''दक्षता अधिकाऱ्यांची'' नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, कृष्णा चांदगुडे, ॲड. रंजना गवांदे व विष्णुदास लोणारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
कोट
इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होण्याचे कारण म्हणजे, भोंदू कितीही मोठा असला तरी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करता येतो, याची पीडितांना शाश्वती मिळाली. अंनिसने त्यांना मानसिक आधार व पाठबळ दिले. पीडितांनी अंनिसशी किंवा संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस