सर्व आवृत्तींसाठी
---
दहशतवादी संघटनेच्या यादीत शहजाद भट्टी नेटवर्क
भट्टीच्या जाळ्यात जळगावातील तरुण; चौकशीला आता अधिक वेग
शेख रईस : सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : समाजमाध्यमांच्या माध्यमातून भारतीय तरुणांना हेरून त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्याविरोधात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सुरू केलेल्या कारवाईला आता केंद्राच्या निर्णयामुळे अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने ‘शहजाद भट्टी नेटवर्क’चा बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) पहिल्या अनुसूचित दहशतवादी संघटना म्हणून समावेश केला आहे. १६ सप्टेंबरला प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेत या संघटनेला ४६ वा क्रमांक देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यापूर्वीच या जाळ्याच्या संशयित संपर्कातील व्यक्तींविरोधात मोठी शोधमोहीम राबविण्यात आली होती. एटीएसच्या १४ पथकांनी राज्यातील १०२ ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली होती. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जळगाव एटीएसने जिल्ह्यातील सात ते आठ तरुणांची चौकशी केली होती. त्यांच्या समाजमाध्यमांवरील हालचाली आणि संपर्कांची माहिती तपासण्यात येत होती.
तरुणांना हेरण्याचा प्रयत्न
केंद्राच्या अधिसूचनेनुसार शहजाद भट्टी नेटवर्ककडून तरुण आणि स्थानिक गुन्हेगारांना आकर्षणे दाखवून त्यांना शस्त्रे, स्फोटके आणि अमली पदार्थांच्या तस्करीसह दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. समाजमाध्यमांसह विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रक्षोभक संदेश प्रसारित केल्याचाही उल्लेख अधिसूचनेत आहे.
बेरोजगार किंवा आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या तरुणांना पैशांचे आमिष दाखवून या जाळ्यात ओढले जात असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा संशय आहे. त्यामुळे जळगावसह राज्यातील संशयितांच्या समाजमाध्यमांवरील संपर्कांची आणि इलेक्ट्रॉनिक साधनांची तपासणी केली जात आहे.
जुलैमध्ये राज्यभर कारवाई
जुलैमध्ये महाराष्ट्र एटीएसने शहजाद भट्टीच्या संपर्कात आलेल्या संशयितांविरोधात राज्यभर शोध व चौकशी मोहीम राबविली होती. या कारवाईत १०२ ठिकाणांवर तपास करण्यात आला. त्यानंतरही संबंधित व्यक्तींच्या समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शहजाद भट्टी नेटवर्कविरोधातील विविध राज्यांतील कारवाईत २५३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. ८० हून अधिक प्रथम माहिती अहवाल दाखल झाले असून, २०० हून अधिक गुन्ह्यांशी संबंधित तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
जळगावातील तरुणांवर कारवाईची शक्यता
‘शहजाद भट्टी नेटवर्क’ला दहशतवादी संघटना म्हणून अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर या जाळ्याशी संपर्क असल्याचे आढळलेल्या व्यक्तींविरोधातील तपासाला कायदेशीरदृष्ट्या अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. मात्र, जळगावात चौकशी झालेल्या तरुणांपैकी कोणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे किंवा कोणाला अटक करण्यात आली आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पालकांनी आपल्या मुलांच्या समाजमाध्यमांवरील अनोळखी संपर्कांबाबत जागरूक राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात आले आहे.