भोंदू खरातच्या जामिनावर
३० सप्टेंबरला सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कॅप्टन उर्फ भोंदू अशोककुमार खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडली आहे. सरकार पक्षातर्फे नियुक्त विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी सत्र न्यायालयात दुसऱ्यांदा हजर राहत खरातच्या जामिनाला कडाडून विरोध केला.
खरातविरोधात महिलांवरील अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल असून, त्यापैकी सहा गुन्ह्यांत दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल झाले आहे. उर्वरित दोन गुन्ह्यांतील दोषारोपपत्रही लवकरच दाखल होणार आहे. यापैकी एका प्रकरणात खरातने जामिनासाठी अर्ज केला आहे.
‘गुन्हे जामीनपात्र असले तरी खरात जामिनास पात्र नाही’
ॲड. निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, खरातविरोधात आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला जामीन देऊ नये, अशी मागणी केली. दरम्यान, १७ मार्च रोजी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातला पहाटे तीनच्या सुमारास अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल झाले.
प्रकरणाच्या तपासासाठी शासनाने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. खरात सध्या न्यायालयीन कोठडीत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे. तसेच, ‘ईडी’ने खरातसह पाच जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून, त्याची कार्यवाही मुंबईतील विशेष न्यायालयात सुरू आहे. जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ३० सप्टेंबरला होणार आहे.