NSK26H29821
---
जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘आनंद गुरुकुल’
---
शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती; जिल्हा परिषदेचा उपक्रम राज्यभर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : विद्यार्थ्यांना बालवयातच खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी नाशिकसह राज्यातील पाच ते दहा जिल्ह्यांमध्ये ‘आनंद गुरुकुल क्रीडा प्रबोधिनी’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज येथे दिली.
जिल्हा परिषदेच्या ‘ज्ञानयात्री’ उपक्रमाची माहिती देण्यासाठी बुधवारी (ता. १६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानयात्री’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील २५ ते ५० विद्यार्थ्यांना शिक्षकांसह नाशिक शहरात आणून विविध शैक्षणिक व पर्यटनस्थळांना भेटी, सैनिक प्रशिक्षण केंद्राची माहिती, तसेच जिल्हा परिषदेच्या कामकाजाची ओळख करून दिली जात आहे. आतापर्यंत चार हजार ९४ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यापक अनुभव देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले.
सुपर १०० पॅटर्न राज्यभर
आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या गुणवंत मुलांसाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘सुपर ५०’ उपक्रमाचा विस्तार करून आता ‘सुपर १००’ करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृह, भोजन आणि शिक्षणासाठी क्लासेसची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आल्याने विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून १०० करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, हा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे नियोजन असल्याचे शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले.
शाळांच्या सुविधांवर भर
जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याबाबत विचारले असता, ही बाब कमी-अधिक प्रमाणात असू शकते. मात्र, आगामी वर्षभरात शाळांच्या सुविधांमध्ये निश्चितच फरक दिसून येईल, असे शिक्षणमंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.