टुडे एक ॲंकर
--
(श्रीगणेशाचा फोटो वापरावा)
---
पाचव्या दिवसाच्या गणरायाचे शनिवारी होणार विसर्जन
उपशीर्षक
तिथीनुसार १९ तारखेस विसर्जन योग्य; पुरोहित, पंचांग अभ्यासकांचे मत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : गणेशोत्सवातील पाचव्या दिवसाच्या गणरायाला शनिवारी (ता. १९) भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. यंदा दहा नव्हे तर तब्बल बारा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे सोमवारी गणपती विराजमान झाल्यानंतर पाचव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन नेमके केव्हा करायचे, याबाबत संभ्रम होता. मात्र, बहुतांश पुरोहित व पंचांग अभ्यासकांच्या मते गौराईसोबतच म्हणजे, शनिवारी पाचव्या दिवसाचे गणपती विसर्जन करणे योग्य आहे.
दरवर्षी साधारणत: दहा किंवा जास्तीत जास्त अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा होत असतो. तिथींचा क्षय झाल्यामुळे काही वेळा असे होते. यंदा मात्र तब्बल बारा दिवसांचा गणेशोत्सव आहे. हरतालिका व श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी (तृतीय व चतुर्थी) आल्यामुळे सोमवारी (ता.१४) गणपतीची प्रतिष्ठापना झाली. त्यानुसार पाचवा दिवस शुक्रवारी (ता.१८) येणे अपेक्षित आहे. असे असले तरी पंचांगातील तिथीनुसार सण- उत्सव साजरे होत असल्याने तिथीनुसार गणपतीला शनिवारी (ता.१९) पाच दिवस पूर्ण होत आहेत.
शिवाय, गणपतीसोबत सोनपावलांनी येणाऱ्या गौराईचे (महालक्ष्मी) गुरुवारी (ता.१७) आगमन झाले. गौरीपूजन व नैवेद्य शुक्रवारी (ता.१८) तर विसर्जन शनिवारी (ता.१९) होणार आहे. गौराईसोबतच पाचव्या दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. त्यामुळे पाचव्या दिवसाच्या गणरायाला १९ तारखेलाच निरोप देणे इष्ट राहील, असे अभ्यासकांनी कळवले आहे.
१४-१
पाचव्या दिवसाच्या विसर्जनाची तयारी
पाचव्या दिवसाच्या गणरायाचे विसर्जन शनिवारी करण्यात येणार असल्याने घराघरांत सकाळपासूनच पूजाविधी, आरती, नैवेद्य आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेण्यात येतील. सार्वजनिक मंडळांकडूनही विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्यात येत आहे.
-----
धार्मिक विधीनंतरच विसर्जन
गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी उत्तरपूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. भक्तिभावाने गणरायाची पूजा करून त्यानंतर विसर्जन करणे शुभ मानले जाते.
------
कोट..
गणपतीची स्थापना ज्या श्रद्धेने केली जाते, त्याच भक्तिभावाने विसर्जन करणे महत्त्वाचे आहे. उत्तरपूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करून गणरायाला निरोप द्यावा. यंदा तिथींच्या क्षयामुळे गणेशोत्सव बारा दिवसांचा आहे. त्यात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन तिथीनुसार शनिवारी १९ तारखेला करणे योग्य आहे.
- ऋषिकेश जोशी, पुरोहित (चिमुकले श्रीराम मंदिर)
------
चौकट
प्रशासनाच्या सुचनांचे पालन
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घेऊन मिरवणुकीत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.