भेसळखोरांवर अन्न प्रशासनाचा धडाका
दहा दिवसांत ३६ कारवाया; पाच कोटी ४० लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागात भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा दिवसांत नाशिक, अहिल्यानगर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत केलेल्या ३६ कारवायांमध्ये तब्बल पाच कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला. यात लोणी, तूप, खवा, मिठाई, फळांचा गर आणि खाद्यतेलाचा समावेश आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर भेसळखोरांविरोधात कारवाई सुरू आहे. नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील चारही जिल्ह्यांत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, मसाले आणि खाद्यतेलाची मागणी वाढते. या काळात भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
अहिल्यानगरमध्ये ३.९५ कोटींचे लोणी जप्त
अहिल्यानगर येथील अरिहंत शीतगृहावर केलेल्या कारवाईत तीन कोटी ९५ लाख ६२ हजार रुपये किमतीचे ७५ हजार ३५६ किलो पाश्चराइज्ड कुकिंग बटर जप्त करण्यात आले. या साठ्याची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत संशय असल्याने नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
निफाडमध्ये फळांचा गर आणि क्रीमचा साठा
कोकणगाव (ता. निफाड) येथील आर्या शीतगृहामधून ३९ लाख १८ हजार रुपये किमतीचा सीताफळ व आंब्याचा गर तसेच क्रीमचा सहा हजार ४५७ किलो साठा जप्त करण्यात आला.
प्रवासी बसमधून मिठाईची वाहतूक
नाशिकच्या द्वारका चौकात पहाटे दोन खासगी प्रवासी बसची तपासणी करण्यात आली. या वेळी अवैधरीत्या वाहतूक केला जाणारा पाच लाख ५८ हजार रुपये किमतीचा दोन हजार १५५ किलो बर्फीचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यात आला.
जळगाव, धुळ्यात तुपावर कारवाई
पाचोरा (जि. जळगाव) येथील ‘न्यू वाघ मिल्क डेअरी’मधून तीन लाख ४० हजार रुपयांचे तूप व क्रीम जप्त करण्यात आले. धुळे शहरातील साक्री रोडवरील गायत्री ट्रेडर्समधून तीन लाख एक हजार रुपयांचे गायीचे व म्हशीचे संशयास्पद तूप जप्त करण्यात आले.
इतर ठिकाणीही कारवाई
सावेडी (अहिल्यानगर) येथील ‘रुचीराज स्वीट्स’मधून दोन लाख २२ हजार रुपयांचे तूप, तर श्रीरामपूर येथून दोन लाख रुपयांचे गायीचे तूप जप्त करण्यात आले. जळगावच्या इच्छादेवी चौकातून एक लाख ६६ हजार रुपयांची अनधिकृत चंदन स्वीट सुपारी जप्त करण्यात आली.
नाशिक शहरातील रविवार कारंजा आणि पंचवटी भागातील विजया एंटरप्रायजेस व प्रकाश एंटरप्रायजेस येथून अडीच लाख रुपयांचे वनस्पती तूप आणि सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. संगमनेर येथून एक लाख रुपयांचे पामोलीन तेल, तर चोपडा येथे हलवा-बर्फीचा साठा जप्त करण्यात आला. नाशिक शहरात गूळ, वेलची आणि तुपाचेही संशयास्पद साठे आढळून आले.
ऑनलाइन तक्रारीची सुविधा
भेसळयुक्त किंवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याचा संशय आल्यास नागरिकांना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकृत तक्रार पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविता येईल. प्रशासनाने नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तातडीने कळविण्याचे आवाहन केले आहे.
कोट
सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवणुकीबाबत कडक तपासणी सुरूच राहील. नागरिकांनीही अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि भेसळ नसल्याची खात्री करावी. संशय आल्यास तत्काळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
-मंगेश माने, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभाग