सेकंड मेन
दुसऱ्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून चाकूहल्ला
जळगावातील घटना; पाचोऱ्यात दोघांत वाद; दिराला चाकूने भोसकले
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१७ : कोल्हे हिल्स परिसरातील रहिवासी किशोर जयराज यांचे दोन लग्न झाले आहेत. दुसऱ्या पत्नीसोबत चारित्र्याच्या संशयावरून दोघांत वाद होऊन पाचोरा पोलिसांत तक्रार दाखल झाली. याचा बदला घेण्यासाठी दुसरी पत्नी आरती, तिचा मुलगा व अन्य एकाने पहिल्या पत्नीस मारहाण केली. यावेळी बचाव करणाऱ्या राहुल जयराज यांच्या पाठीत व पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी करण्यात आले.
कोल्हे हिल्स माऊलीनगर येथील रहिवासी किशोर मोहन जयराज (वय ३४) यांचा एअर कंडिशनर दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांचे पहिल्या पत्नीव्यतिरिक्त शिवाजीनगर हुडको येथील आरती रमेश लोखंडे (आरती किशोर जयराज) हिच्यासोबत गेल्या १७ ते १८ वर्षांपासून प्रेमसंबंध असून त्यांनी मंदिरात लग्नही केले आहे. आरतीने किशोरला मुंबईला जात असल्याचे सांगितले. मात्र ती पाचोऱ्यात आढळून आल्याने मंगळवारी (ता.१५) दोघांत वाद झाला. आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत भांडण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
घरात घुसून चाकूने वार
याच वादाचा राग मनात धरून बुधवारी (ता.१६) दुपारी आरती लोखंडे (जयराज) हिने तिच्या नातेवाईकांसह किशोर जयराज यांच्या माऊलीनगर येथील राहत्या घरी जाऊन पहिल्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच किशोर यांचा भाऊ राहुल जयराज हा मध्यस्थी करत भांडण सोडवत असताना दोघा महिलांनी राहुल याला पकडले व कार्तिक रमेश लोखंडे याने मागून पाठीत तर किरण वसंत पवार याने पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाल्याने खाली कोसळला. इतक्यात भाऊ किशोर घरी पोहोचल्याने त्याने तत्काळ त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
चौकट
गुन्हा दाखल
किशोर जयराज यांच्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात आरती लोखंडे (जयराज), सुशिला वसंत पवार, कार्तिक रमेश लोखंडे, किरण वसंत पवार यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक विजय पाटील तपास करीत आहेत.
-----पुर्ण