(पान १ ला मेन)
NSK26H29890/ NSK26H29891
नंदुरबार : पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्यात दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ. दुसऱ्या छायाचित्रात लाभार्थ्यांना टुलकिट वाटप करताना डॉ. मिताली सेठी. शेजारी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, दिलीप काकडे, सुहास कोतकर, नंदनकुमार पैठणकर, दिनेश पाटील, संदीप बोरसे, रुपेश पाटील.
--------
पारंपरिक कारागिरांना आर्थिक पाठबळ
पालकमंत्री हसन मुश्रीफ : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमुळे सक्षमीकरण
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही पारंपरिक कारागिरांच्या हाताला काम आणि त्यांच्या कामाला सन्मान देणारी योजना आहे. कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्यविकास तसेच आर्थिक पाठबळ उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम करणे हा योजनेचा उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात सेवा संकल्प अभियानातंर्गत पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळावा तसेच सन्मान सोहळा झाला. त्यावेळी पालकमंत्री मुश्रीफ दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिलीप काकडे, एसबीआयचे महाव्यवस्थापक सुहास कोतकर, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यस्थापक नंदनकुमार पैठणकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिनेश पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप बोरसे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक व्यवसाय करणारे कारागीर आपल्या कौशल्यातून पारंपरिक पद्धतीने विविध वस्तू तयार करीत आहेत. त्यांच्या कौशल्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले जात आहे. देशातील पारंपरिक कला व कौशल्य जिवंत ठेवणे आणि तरुणांना स्वयंरोजगाराकडे वळविणे हा आहे, हा योजनेचा उद्देश आहे. कारागिरांनी स्वतःचा उद्योग उभारून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या, विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येईल. लाभार्थ्यांची संख्या, कर्ज वितरण, कर्जाची परतफेड तसेच लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा नियमित आढावा घेतला जाईल.
या वेळी जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. पैठणकर, स्टेट बँकेचे महाव्यवस्थाक श्री. कोतकर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना टुलकिट वाटप, बँक कर्ज मंजुरी पत्राचे वाटप झाले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री. पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
------------
उत्पादनांना बाजारपेठ देणार
बँकांनी लाभार्थ्यांच्या कर्जासंदर्भातील प्रकरणास मंजुरी द्यावी. लाभार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्हॉट्सॲपद्वारे नोंदविण्यात यावी. आगामी काळात जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली जाईल. तसेच जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी सांगितले.
-----------------------------------
योजनेची जिल्ह्यातील स्थिती
कारागिरांची नोंदणी : ६० हजार ९४६
विश्वकर्मा ओळखपत्र वितरण : ३ हजार ५३७
कौशल्य पडताळणी पूर्ण : २ हजार ५९६ कारागिर
टूलकिटचे वाटप : १ हजार ५२ कारागिर
६३८ लाभार्थी : १ लाख रुपयांचे कर्ज मंजूर
कर्जाचे वितरण : ४९८ कारागिर